सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची भात शेती नाचणी भुईमूग व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीच्या बाबत प्रशासनाने व शासनाने लक्ष द्यावे यासाठी निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर उर्फ तुषारराय प्रकाश वारंग, यशवंत तेली, महेश चव्हाण, तुषार चीपकर, कृष्णा परब, सचिन मुळीक, प्रदीप सावंत, मेघश्याम भगत, उत्तम नाईक, विठ्ठल माळकर आदींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात जिल्ह्यात गेले आठ पंधरा दिवस पावसाने आणि भात कापणी हंगामामध्ये झोडपून काढले आहे. परतीच्या पावसाने अवकाळी पाऊस झाल्याने भात शेतीचेतसेच सुमारे ५० ते ५५ हेक्टर नाचणी पीकक्षेत्रही बरेच शेतकरी घेत असतात त्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. या, पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे शासनाने तात्काळ अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांना ज्याप्रमाणे मदत दिली. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही याचा विचार करावा आणि हाता तोंडाशी आलेला घास भात पीक नाचणीयासह पिकांचा घास परतीच्या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला आहे. पावसाचा फटका पुढील येणाऱ्या रब्बी हंगामात आंबा काजूवरही येण्याची दाट शक्यता आहे. याकरिता शासनाने यावर तात्काळ पावले उचलून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावा व ओला दुष्काळ जाहीर करावा. सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी संघटना व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असून जिल्ह्यातील आंबा, काजू व भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाने या मागणीचा विचार करून राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


