नांदेड : शिवसेनेतील ऐतिहासिक बंडखोरी आणि त्यानंतर गाजलेल्या गुवाहाटी दौऱ्याचे अनेक किस्से आजही राज्यात चवीने चर्चिले जातात. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील!’ या संवादानंतर आता या पोतडीतून अजून एक मजेदार आणि धक्कादायक किस्सा बाहेर आला आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना, बंडखोरीच्या वेळी तणावाखाली आलेल्या एका आमदाराचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. गुवाहाटीतील बंडखोरीदरम्यान शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर एवढे तणावाखाली होते की त्यांनी हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार केला होता, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह 20 जून 2022 रोजी शिवसेनेत बंड पुकारले. यानंतर ते सुरतहून गुवाहाटीला गेले होते. या दौऱ्यात शहाजीबापू पाटलांचा ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’, हा संवाद चांगलाच गाजला होता. यासोबत अनेक कथा आणि किस्सेही समोर आलेत. आता संजय शिरसाट यांनीही गुवाहाटी दौऱ्यातील एक किस्सा सांगितला आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला निधी दिल्याबद्दल संजय शिरसाठ यांचा नांदेडमध्ये सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेनेतील बंडखोरीदरम्यानचे अनेक अनुभव मोकळेपणाने मांडले.
नेमके काय म्हणाले संजय शिरसाट?…
“मी गेली 42 वर्षं राजकारणात आहे. आयुष्यातील ही माझी तिसरी बंडखोरी होती, पण आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासाठी ती पहिलीच वेळ होती,” असे सांगत शिरसाट पुढे म्हणाले, “त्या वेळी आम्ही संख्या मोजत होतो. कल्याणकर इतके व्याकुळ झाले होते की त्यांनी जेवणही सोडले होते. चेहऱ्यावर सतत भीती होती, आमदारकी रद्द झाली तर मतदारसंघात काय परिणाम होईल? याची त्यांना चिंता होती. एवढा तणाव आला होता की ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते.
संजय शिरसाट म्हणाले, आम्हाला एका एका आमदाराचे पडले होते. एखादा आमदार कमी-जास्त झाला असता, तर आमची सुद्धा आमदारकी रद्द झाली असती. म्हणून आम्ही बालाजी कल्याणकर यांच्यासोबत दोन माणसं नेहमी ठेवली होती.
संजय शिरसाट पुढे म्हणाले, त्यांना सांगितले कल्याणकर आम्ही करतोय, आमचा राजकारण पणाला लावतोय. उद्या काय बरे वाट होईल आम्ही डायरेक्ट वॉश आऊट होऊ. तू नवीन आहे तुला कोणीही माफ करेल, परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही. हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.
आमच्यापेक्षा कल्याणकर हुशार निघाले –
आज कल्याणकरने जे काम केले त्याच्या पहिले 25 आमदार झाले असतील, पाच आमदार झाले असतील मतदारसंघात जास्त काम केले का नाही. आमच्यापेक्षा हुशार तोच निघाला सगळ्यात जास्त निधी त्यांनाच घेतला, दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला. आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा, असेही संजय शिरसाट कल्याणकर यांना उद्देशून म्हणाले.


