मुंबई : रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणात एक मोठी माहिती समोर येत आहे. त्याने मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवले होते. सोबतच मुलांना ओलीस ठेवून त्याने मला काहीतरी बोलायचे आहे, काहीतरी सांगायचे आहे? असा संदेश देणार एक व्हिडीओ शेअर केला होता. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता. आता याच प्रकरणात आता मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांना फोन केला आहे. लवकरच केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे. रोहित आर्याने जेव्हा मुलांना ओलीस ठेवले होते. तेव्हा पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती. मात्र दीपक केसरकर यांनी रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिला होता, अशी माहिती मिळालेली आहे. याच प्रकरणी आता मुंबई पोलीस दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहेत.
केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला –
रोहित आर्याने मुलांना जेव्हा ओलीस ठेवले होते, तेव्हा पोलीस त्याच्याशी चर्चा करत होते. यावेळी त्याने मला दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी केली होती. रोहित आर्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न पोलीस करत होते. मात्र केसरकरांनी आर्याशी बोलण्यास नकार दिला आणि नंतर आर्याचे एन्काऊंटर करण्यात आले. दीपक केसरकर अप्रत्यक्षपणे का होईना या प्रकरणाशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळेच त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी येत्या काळात केसरकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.
रोहित आर्याने नेमका काय आरोप केला होता?
रोहित आर्याने शिक्षण विभागावर गंभीर स्वरुपाचे आरोप केलेले होते. शिक्षण विभागाने माझ्या कामाचे पैसे थकवलेले होते, असा दावा रोहित आर्याने केला होता. हे पैसे मिळावेत म्हणून त्याने अनेकवेळा आंदोलनही केले होते. रोहित आर्याचे पैसे कथितपणे अडकलेले असताना दीपक केसरकर हे शिक्षण विभागाचे मंत्री होते. शिक्षण विभागाने मात्र रोहित आर्याशी कोणताही करार केलेला नव्हता, असे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता केसरकर यांचा जबाब कधी नोंदवला जाणार आणि केसरकर नेमकी काय माहिती देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


