– विरोधात कोणतेही पुरावे नाहीत :जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निर्णय.
कुडाळ : करंजे येथील संतोष मनोहर परब याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह तिघांची जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात ठोस असे पुरावे नसल्यामुळे ही दोष मुक्तता करण्यात आली आहे अशी माहिती ॲड.संग्राम देसाई यांनी दिली आहे.
२०२१ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तत्कालीन बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे कणकवली कनकनगर येथे राहणारे आणि मूळचे करंजे येथील संतोष मनोहर परब यांच्यावर १८ डिसेंबर २०२१ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. यावेळी संतोष परब यांच्या मोटरसायकलला चार चाकी वाहनाने धडक दिली होती. आणि त्या धडकेनंतर गाडीमधील एका इसमाने उतरून संतोष परब याला ‘तू सतीश सावंत यांच्या प्रचाराचे काम करतोस’ असे विचारून धारदार चाकू काढून हल्ला केला होता. त्याचदरम्याने त्याने नितेश राणे व गोट्या सावंत यांना सांगितले पाहिजे असे सांगून त्या इसमाने फोन लावला होता. आणि या बाबत संतोष परब यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांना सुद्धा अटक करण्यात आली होती.
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयांमध्ये सुरू असताना ॲड. संग्राम देसाई यांनी न्यायालयासमोर पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रानुसार आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयासमोर मांडले की, या प्रकरणी पालकमंत्री नितेश राणे तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत, राकेश प्रल्हाद परब यांच्या विरोधात कोणतेही पुरावे दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचा या प्रकरणी सहभाग आहे हे दिसून येत नाही. त्यामुळे त्यांना या प्रकरणातून दोष मुक्त करावे असा अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन मत्स्य व बंधारे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह संदेश उर्फ गोट्या सावंत, राकेश प्रल्हाद परब या तिघांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एस. देशमुख यांनी या प्रकरणातून दोष मुक्त केले आहे. याप्रकरणी ॲड. संग्राम देसाई यांच्या सोबत ॲड. अविनाश परब,ॲड. सुहास साटम, ॲड. जान्हवी दुधवडकर, ॲड. सौरभ देसाई, ॲड. संजना देसाई यांनी काम पाहिले आहे याबाबत ॲड. संग्राम देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.


