सावंतवाडी : मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्यात सर्वात महत्त्वाची साथ लाभली ती केवळ सावंतवाडीची जनता, श्री देव पाटेकर आणि आमचे नेते रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यामुळेच. बाकी कोणाचाही संबंध नाही, असा पलटवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे भाजपचे नेते नितेश राणेंवर केला.
दरम्यान दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मोठी ताकद आहे. यापूर्वी सुध्दा त्यांनी दोन वेळा निवडणूक लढवली होती आणि निवडून आले होते. त्यामुळेच कोणी ताकदीची भाषा करू नये, असे ही त्यांनी सांगितले. श्री. परब यांनी आज मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सचिव परीकक्षित मांजरेकर, तालुकाध्यक्ष बबन उर्फ नारायण राणे, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, विनायक म्हाडेश्वर, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष क्लेटस फर्नांडिस, सुदन कवठणकर बंटी पुरोहित यांसह अन्य उपस्थित होते.


