सावंतवाडी : येथील एका नामांकित कंपनीकडून कामावर असलेले युवक व युवती यांचे तब्बल तीन ते चार महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर काही कर्मचाऱ्यांचा पीएफ ही अदा करण्यात आलेला नाही. शिवाय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले काही धनादेश बाउन्स झालेले आहेत. त्यामुळे सदर कंपनीने या 210 कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पीएफ पुढील सात दिवसात न दिल्यास कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, किंबहुना कार्यालय देखील फोडण्यात येईल, असा जोरदार इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी दिला आहे. आज अन्याय झालेल्या सदर कर्मचाऱ्यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष केसरकर यांची भेट घेऊन आपले म्हणणे सादर केले .
सदर कर्मचार्यांसमवेत केसरकर यांनी सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, राहुल जांबरे, तसेच सदर कंपनीत अन्याय झालेले कर्मचारी निखिल सावंत, समीर लाड, मंगेश चांदवडकर, अनिकेत बोभाटे, मोहम्मद सलमान खान, अंकिता उपरकर, दिशा हर्डीकर, उजमा बेग, गौरी मेस्त्री, खादीजा रेडकर, मंजिरी उपरकर, प्रतीक्षा गावडे, अक्षता इंगळे, तन्वी राणे, मनीषा निगुडकर, धीरज तुळसकर यांसह अनेक कर्मचारी युवक – युवती उपस्थित होते.


