ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टाने एक महिन्याची डेडलाईन दिली आहे. तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यायची गरजही लागणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर हजर झाले. २००८ मधील रेल्वे भरती बोर्ड परीक्षा संबंधित मारहाण आणि प्रक्षोभक भाषणाच्या प्रकरणी ही सुनावणी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात पार पडली.
कल्याण कोर्टात दाखल झालेली हा खटला आता आता ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात हस्तांतरित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेले त्यांचे सात सहआरोपी देखील यावेळी कोर्टात उपस्थित होते. यामध्ये मनसेचे प्रमुख नेते नितीन देसाई, अभिजीत पानसे, अविनाश जाधव, आणि नितीन सरदेसाई यांचा समावेश होता.
ही सुनावणी सुरू होताच, न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना थेट विचारणा केली की गुन्हा कबूल आहे का? त्यावर राज ठाकरे यांनी कोणताही विलंब न लावता स्पष्ट उत्तर दिले मला गुन्हा कबूल नाही. राज ठाकरे यांच्या बाजूने ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी युक्तिवाद केला.


