सावंतवाडी : शहरातील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्नेहसंगम’ २०२५-२६ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्याचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील वर्षभरातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक व मान्यवरांसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, शालेय समिती अध्यक्ष प्रा.सतिशचंद्र बागवे,सदस्या वसुधा मुळीक प्रमुख पाहुणे म्हणून राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडीचे सर्व माजी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक,उपप्राचार्य, पर्यवेक्षक,प्राध्यापक, शिक्षक, माता-पालक संघाचे उपाध्यक्ष भंडारी मॅडम,तसेच विद्यमान मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर,उपप्राचार्य डॉ.सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्राध्यापक,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी स्वागतगीत व प्रस्ताविकेद्वारे कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यात आली. तर शुभेच्छा देताना माझी उपप्राचार्य नारायण देवरकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खूप मोठ्या स्तरावरती काम करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ व मुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक,प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.
वर्षभर विविध शैक्षणिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, विज्ञान प्रदर्शन तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आत्मविश्वास झळकत होता.

सांस्कृतिक कार्यक्रम हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली समूहनृत्ये, लोकनृत्य, देशभक्तीपर गीत, एकांकिका व नाट्यछटा यांना उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून शिस्त, कलागुण, संघभावना व सर्जनशीलता यांचे उत्तम दर्शन घडले.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी केवळ गुणांपुरते मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक मूल्ये, सामाजिक भान व देशभक्ती जोपासावी, असे आवाहन केले. तसेच बदलत्या काळात आधुनिक ज्ञानाबरोबरच संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.
तर प्राचार्य संप्रवी कशाळीकर यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकवृंदाचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातही शाळा गुणवत्ता व संस्कारांची परंपरा जपत नवे उपक्रम राबवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा सांगता समारंभ विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहणारा ठरून शाळेच्या उज्ज्वल शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत मानाचा शिरपेच ठरला.
सूत्रसंचालन प्रा.मिलिंद कासार यांनी केले तरआभार पर्यवेक्षक नामदेव मुठे यांनी मानले.



