Friday, December 26, 2025

Buy now

spot_img

प्रेरणादायी!- ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर यांना केंद्रिय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर ! ; ११ जानेवारी रोजी बेळगाव येथे दिग्गजांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा!

मालवण: तालुक्यातीलआचरे येथील सानेगुरूजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरूजी यांना अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचा मानाचा केंद्रिय ‘बालसेवा पुरस्कार’ आजच जाहीर झाला. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या निवड मंडळाने एकमताने ठाकूर गुरूजी यांची निवड केली. मा. हसन देसाई – कोल्हापूर (अध्यक्ष), सुनिल पुजारी – सोलापूर (सचिव) अखिल भारतीय सानेगुरूजी केंद्रिय समिती यांनी आज जाहीर केले.

दहा हजार रूपये (रू.10,000/-) रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण बेळगाव येथे रविवार दि. 11 जानेवारी 2026 रोजी कथामालेच्या राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे. अ. भा. सानेगुरूजी कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी ठाकूर यांचे अभिनंदन करताना म्हटले ‘कथामाला संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकरांच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आज गौरव झाला आहे’.

सुरेश ठाकूर (गुरूजी) हे गेले अर्धशतकाहून जास्त काळ बालसेवेचे कार्य अविरत करीत आहेत. 1972 पासून ते सानेगुरूजी कथामालेचे कार्य आपल्या सहकाऱ्यांसोबत तन, मन आणि धनही अर्पण करून करीत आहेत. ‘करी रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे’ हा सानेगुरूजींचा मूलमंत्र प्रमाण मानून त्यांनी कोकण विभागात ‘शाळा तेथे कथामाला’ हा उपक्रम राबविण्याचा मनापासून प्रयत्न केला. अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी सत्तरच्यावर ‘कथामाला तंत्र आणि मंत्र’ याविषयावर मार्गदर्शन शिबीरे घेतली आहेत. मुलांना कथा कशा सांगाव्यात? या विषयावर त्यांची आकाशवाणीच्या मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग केंद्रावरून प्रबोधने झालेली आहेत. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ या विषयासंबंधी त्यांची मुलाखत तत्कालीन दूरदर्शन कार्यक्रम संचालक विनायकराव चासकर यांनी प्रसारित केली होती. गेले अर्धशतक मालवण कथामालेच्या माध्यमातून ते ‘तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा’चे भव्य आयोजन करीत आहेत. शालेय मुलांसाठी आकाशदर्शन, पक्षीनिरीक्षण, पाणपोई यासारखे अनेक उपक्रम आपल्या कथामाला सवंगड्यामार्फत त्यांनी राबविले आहे. 1978 साली आचरे येथे ‘आनंद बालनाट्य मंडळ’ ही संस्था स्थापन करून त्या बालनाट्य मंडळामार्फत वीसच्यावर बाल एकांकीका सादर करून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. त्यांच्या ‘रंगरंगीले छैल छबीले’, ‘मर्कट कथा’, ‘मिशी हरवली आहे’, ‘अगडम बगडम झगडा खतम’, ‘नारद झाला गारद’, या एकांकीका रसिकांच्या मनात आजही आहेत. त्यामुळे एक हजारच्यावर बाल कलाकारांना रंगमंच प्राप्त झाला. बाल रंगभूमीच्या कार्यासाठी त्यांना पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, अनंत भावे, पुष्पा भावे आदींकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यापूर्वी बालरंगभूमीच्या कार्यासाठी श्रीनिवास नार्वेकर यांनी नाट्यतपस्वी आत्माराम सावंत पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविलेेले आहे. सदर पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी या बुजुर्गांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला आहेत.

कथामालेच्या कार्यासाठी यापूर्वी त्यांना बाळासाहेब भारदे (माजी सभापती – विधान परिषद, महाराष्ट्र राज्य) आणि मधुकरराव चौधरी (माजी शिक्षणमंत्री – महाराष्ट्र राज्य) यांनी गौरविलेले आहे. कथामालेची सेवामयी व्यक्तिमत्वे – प्रकाशभाई मोहाडीकर, मधुभाई नाशिककर, युदनाथ थत्ते, राम शेवाळकर, अँड. चंद्रशेखर धर्माधिकारी, राजाभाऊ मंगळवेढेकर, हरिभाऊ दामले, प्र. दी. पुराणिक आदींचा त्यांना दीर्घ सहवास लाभला. आज वयाची सत्तरी पार करूनही आणि त्यांच्या एका अवघडं शस्त्रक्रीयेनंतर बालसेवा अविरत सुरू आहे. ‘माझ्या तनामनात कथामालेचे बीज रूजविणारे मधु वालावलकर, ज्ञानेश देऊलकर, श्रीपाद तोंडवळकर, प्र. के. वालावलकर, श्रीपाद पराडकर आणि चिंतामणी विश्राम धुरी या मालवणच्या विभूतीना हा पुरस्कार समर्पित करतो’ असे आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles