सावंतवाडी : कोकणच्या रेल्वे इतिहासात ‘तुतारी एक्सप्रेस’ ही केवळ एक गाडी नव्हे, तर कोकणवासीयांच्या हक्काची, संघर्षाची आणि अपेक्षांची प्रतिक बनली होती. मात्र हीच तुतारी आता सावंतवाडीऐवजी थेट गोंव्याला नेण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याने कोकणाच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडण्याची भिती निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न गेली अनेक वर्षे केवळ कागदावरच फिरत आहे. प्रत्येक वेळी नवे कारण, नवी तारीख आणि नवी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कामाची गती मात्र कासवगतीच राहिली आहे. टर्मिनस अपूर्ण आहे म्हणून गाडी पुढे नेणे, हा सोपा मार्ग प्रशासनाने निवडला असला, तरी त्यामुळे कोकणवासीयांवर अन्याय होतो, याचा विचार केला गेला आहे का?
आज ‘मेंटेनन्स सुविधा नाही’, ‘पुरेशी जागा नाही’, ‘यार्ड अपूर्ण आहे’ अशी कारणे पुढे केली जात आहेत. पण हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाही. गेल्या अनेक वर्षांत यासाठी वेळ, निधी आणि संधी उपलब्ध असूनही जर टर्मिनस उभा राहू शकला नाही, तर त्याची जबाबदारी कोणाची? कोकणवासीयांची, की प्रशासनाची?
तुतारी एक्सप्रेस गोंव्याला नेल्याने सोयीच्या नावाखाली कोकणची गैरसोयच वाढणार आहे. प्रवाशांना अधिक अंतर, अधिक खर्च आणि अधिक त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी, चाकरमानी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय अन्यायकारक ठरणार आहे.
हा प्रश्न केवळ एका गाडीपुरता मर्यादित नाही. हा कोकणच्या विकासदृष्टीचा, प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांचा आणि स्थानिक जनतेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा आरसा आहे. कोकण कायम ‘नंतर पाहू’च्या यादीत राहणार असेल, तर इथल्या विकासाच्या गप्पा केवळ भाषणांपुरत्याच मर्यादित राहतील.
“आता नाही तर कधीच नाही,” हा कोकणवासीयांचा उद्गार केवळ भावनिक नसून, तो प्रशासनासाठीचा इशारा आहे. तुतारी गोंव्याला रवाना करण्यापेक्षा सावंतवाडी टर्मिनसचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून, गाडी कोकणातच थांबवणे हेच योग्य ठरेल. अन्यथा, कोकणवासीयांचा संयम सुटल्यावर उशिरा जागे झालेले निर्णय फारसे उपयोगी ठरणार नाहीत.


