सावंतवाडी : भाजपचे पदाधिकारी क्लेटस फर्नांडिस यांनी पोलिस ठाण्यात उपोषण छेडले होते. आपल्या सहकाऱ्यांसह उपोषण छेडत अनाधिकृत बांधकाम व सेक्युरिटी गार्डकडून दहशत होत असल्याबाबत भाजपच्याच युवा नेत्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात उपोषण छेडले आहे. या उपोषणाला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत निषेध केला आहे. तसेच संबंधित भाजप युवा नेत्यांने उपोषणकर्त्या फर्नांडिस यांच्याकडून बदनामी होत असल्याने वकिलांतर्फे नोटीस देत ५ कोटींचा दावा ठोकला आहे.
भाजपचे युवा पदाधिकारी क्लेटस् फर्नाडिस चराठे ग्रामपंचायत येथील रहीवाशी असून भाजपच्याच युवा नेत्याबाबतचा तक्रार अर्ज त्यांनी चराठा सरपंच यांना दिला होता. चराठा ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत अनाधिकृत बांधकाम केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच भाजप युवा नेत्याच्या दबावाखाली सरपंच काम करीत आहात असा आरोपही त्यांनी केला आहे. तर त्या नेत्याच्या घराबाहेर हत्यारबंध बंधूकधारी सेक्यूरीटी गार्ड ठेवले असून सेक्यूरिटी गार्ड चराठा गावच्या रहदारीच्या रस्त्यावर उभा असतो. त्यामुळे गावातील रहीवाशांमध्ये या रस्त्यावरुन दहशत निर्माण करुन येता जाता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपच्या युवा नेत्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत भाजपचे युवा कार्यकर्ते असणारे क्लेटस फर्नांडिस यांनी पोलिस ठाण्यात उपोषण छेडले होते.
दरम्यान, जिल्हयात विविध आंदोलने निदर्शने तसेच आगामी सण उत्सव अनुषंगाने कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचीत प्रकार घडू नये, जातीय सलोखा व कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी या करीता प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. असे असतानाही आपण आपले मागण्या करीता आमरण उपोषण सारखा मार्ग स्वीकारणे उचित नाही. तरी देखील आपण आपल्या म्हणण्यावर ठाम राहून आमरण उपोषण केल्यास व त्या दरम्याने कोणताही अनुचित प्रकार घडून शांतता भंग होवून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरून आपल्या विरूद्ध प्रचलित कायदान्वये कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी नोटीस पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपोषण कार्त्यांना दिली आहे.
‘त्या’युवा नेत्याकडून पाच कोटींचा दावा –
दरम्यान, संबंधित युवा भाजप नेत्यांने वकीलांकरवी कायदेशीर नोटीस भाजप तालुका उपाध्यक्ष क्लेटस फर्नाडिस यांना बजावली आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे व नाहक बदनामी करण्याच्या इराद्याने चुकीचा मजकूर लिहिला असून त्यामूळे अशीलांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच राजकीय व व्यवसायिक क्षेत्रामध्ये बदनामी झाली आहे. समाजातील प्रतिमा मलीन झाल्यामुळे आमच्या अशिलांची समाजात बेअब्रू झालेली असून शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला आहे. तसेच दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकारामुळे व समाजात बेअब्बू झाल्याने नुकसान भरपाई पोटी पाच कोटी द्यावे, अन्यथा विरुद्ध दिवाणी अथवा फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल असा नोटीस बजावली आहे.
शिवसेनेचा उपोषणाला पाठिंबा –
शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या युवा नेत्या विरोधात होणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याच्या उपोषणाला भेट देत पाठिंबा जाहीर केला. पाचशे रूपयांचा निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा यावेळी शिवसैनिकांनी दिल्या. याप्रसंगी तालुकाप्रमुख नारायण राणे, अनारोजीन लोबो, बाबु कुडतरकर, अँड. निता सावंत, गजानन नाटेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर –
भाजपच्या पदाधिकाऱ्याने भाजपच्याच युवा नेत्याविरोधात उपोषण छेडल्यान पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपातील दोन उघड गट दिसून आले आहेत. पक्षांतर्गत वादाने पोलिस ठाण्याची पायरी गाठली आहे. तर युवा नेत्याच्या घरापर्यंत विषय पोहचल्याने व भाजपच्या पदाधिकाऱ्यावर ५ कोटीचा दावा केल्याने भाजपचे वरिष्ठ याबाबत कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात आम. वैभव नाईक यांनी टेंडर मॅनेज प्रकरणी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर बाउंसर संस्कृतीचा आरोप केला होता. अशातच आता बाउंसरची दहशत खुद्द भाजपचेच पदाधिकारी अनुभवू लागल्याने हा विषय देखील राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.


