सावंतवाडी : माजी आमदार आणि भाजपाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी भाजप विधानसभा प्रमुख व प्राथमिक पक्ष सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे.
याबाबत नुकताच त्यांनी राजीनामा भाजपा वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ऑनलाईनद्वारे राजीनामा दिला आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2014 पासून राजन तेली यांनी जिल्ह्यात तसेच सावंतवाडी मतदारसंघात भाजप पक्ष वाढवण्यास मोलाचा वाटा उचलला होता. मात्र दोन वेळा त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने राजन तेली नाराज होते. त्यांनी आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने अद्यापपर्यंत त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नसल्याने राजन तेली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समजत आहे. त्यामुळे आज ते ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
राजन तेली यांनी हाती मशाल घेतल्यास मंत्री दीपक केसरकर यांची डोकेदुखी वाढणार असून विधानसभा मतदार संघात जोरदार चुरस होणार आहे.


