मुंबई : विधानसभा निवडणुकीला कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, असा चंग बांधलेल्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना महायुतीच्या जागावाटपात किंचित माघार घ्यावी लागणार, असे दिसत आहे. कारण महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. नायब सिंह सैनी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी महायुतीचे नेते गुरुवारी चंदीगढमध्ये जमले होते. यावेळी एनडीए आघाडीच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यानंतर आता महायुतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. यामध्ये भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा हट्ट सोडलेला दिसत आहे.
विधानसभा निवणुकीचे उमेदवारी अर्ज भरायला अवघे चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेला महायुती, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची उत्सुकता लागली आहे. महायुतीच्या गोटातून आलेल्या माहितीनुसार भाजप आता 140 ते 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे. तर शिंदेंची शिवसेना 80 ते 87 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादी 60 ते 65 जागा लढणार असल्याची माहिती समजतेय. 20 ते 25 जागांवर अजूनही चर्चा सुरु आहे, अशी माहिती महायुतीच्या वर्तुळातून समोर आली आहे.
भाजपची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर होण्याची शक्यता –
भाजपची पहिली उमेदवार यादी आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. अपेक्षित असलेल्यांचा या यादीत समावेश असणार आहे. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही नावांसाठी आग्रह धरल्याची माहिती आहे. संघाचा हा आग्रह भाजप पूर्ण करणार का याचीही उत्सुकता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 100 हून अधिक जणांचा समावेश असेल अस बोललं जातंय. त्यातच यावेळी 30 टक्के उमेदवार बदलले जातील अशीही चर्चा आहे. त्यामुळे भाजपने भाकरी फिरवली तर नेमकी कुणाला संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.