सावंतवाडी : शहरातील तीनमुशी नाका परिसरात पहाटेच्या गस्ती दरम्यान पोलिसांनी संशयास्पदरीत्या एसी कॉम्प्रेसरची वाहतूक करणाऱ्या दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमेश केशव नाईक (वय ३१, रा. माणगाव-कालेली) आणि सोहम मुकुंद पिळणकर (वय १९, रा. सालईवाडा, सावंतवाडी) हे आपल्या वाहनातून एक एसी कॉम्प्रेसर घेऊन जात असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला आढळून आले.
यावेळी गस्तीवरील पोलीस हवालदार श्री. कोरगावकर आणि सुरेश पाटील यांनी दोघांची चौकशी केली. मात्र, त्यांच्या ताब्यातील एसी कॉम्प्रेसरबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे संशयाच्या आधारे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना आज पहाटे सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास तीनमुशी नाका येथे उघडकीस आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुरेश पाटील करीत आहेत.



