सिंधुदुर्गच्या वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडमध्ये, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर युद्धपातळीवर उपाययोजना सुरू! ; परजिल्ह्यांतून विशेष पथके, साहित्य आणि मनुष्यबळ तातडीने सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे रवाना!

सिंधुदुर्ग : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर वीज संकटाची राज्य सरकारने तातडीने दखल घेतली असून, मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार विशेष बैठक घेऊन युद्धपातळीवरील उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. सांगली, सातारा आणि बारामती येथून विशेष कामगार पथके, तसेच आवश्यक साहित्य आणि ट्रान्सफॉर्मर सिंधुदुर्गात तातडीने पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत मोडलेले वीज खांब तातडीने उभे करून खंडित वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच राज्याच्या मेजर स्टोअरमधून आवश्यक ट्रान्सफॉर्मर, वीज साहित्य आणि उपकरणे तातडीने उपलब्ध करून देण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे, कोकण मंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, सिंधुदुर्गचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुमारे ६०० वीज खांब आणि अनेक ट्रान्सफॉर्मर बाधित झाले असून, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. दोडामार्ग तालुक्यातील ६२ गावे प्रभावित झाली असून काही भाग गेल्या आठ दिवसांपासून अंधारात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचीही यावेळी गंभीर दखल घेण्यात आली.

यंत्रणेला आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणे तातडीने उपलब्ध करून देत युद्धपातळीवर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले. भविष्यात अशा परिस्थितीत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी प्रभावी नियोजन करण्याबरोबरच वारंवार बाधित होणाऱ्या भागांची विशेष पाहणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत धोकादायक ठिकाणांची ओळख पटवून आवश्यक खबरदारी घेण्याचेही आदेश त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग हा अतिवृष्टीप्रवण आणि दुर्गम जिल्हा असल्याने केवळ पावसाळा सुरू झाल्यानंतर नव्हे, तर जानेवारी महिन्यापासूनच पूर्वतयारी आणि नियोजन सुरू करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. हवामानातील बदल आणि अल निनोच्या परिणामांचा विचार करून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज ठेवावी, आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांची वेळेत उपलब्धता सुनिश्चित करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्य सरकारच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे सिंधुदुर्गातील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत होण्याची आशा निर्माण झाली असून, संकटग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles