सोनुर्लीचा बीएसएनएल टॉवर ‘कोमात’! ; झाडाझुडपांच्या विळख्यात सेवा ठप्प, ग्रामस्थांचा संताप अनावर.

सावंतवाडी : डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही अत्यावश्यक सेवा बनली असताना सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावातील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, टॉवरच्या परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांनी आणि वेलींनी संपूर्ण संरचनेलाच विळखा घातल्याने हा टॉवर “शोभेची वस्तू” बनल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

प्रसिद्ध माऊली मंदिरामुळे सोनुर्ली येथे वर्षभर राज्यभरातून भाविक येत असतात. मात्र, टॉवर बंद असल्याने मोबाईल नेटवर्क गायब झाले असून फोन कॉल, इंटरनेट सेवा, यूपीआय व्यवहार आणि ऑनलाइन कामे ठप्प होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांसह भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, टॉवरच्या परिसराची वर्षानुवर्षे देखभालच झालेली नसल्याचे चित्र आहे. वाढलेल्या झाडाझुडपांनी व वेलींनी संपूर्ण टॉवरला वेढा घातला असून, संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी अनेकवेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “टॉवर आहे, पण नेटवर्क नाही” अशी उपहासात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.

बीएसएनएल प्रशासनाने तातडीने टॉवरची दुरुस्ती करून परिसरातील झाडाझुडपे हटवावीत आणि मोबाईल सेवा त्वरित पूर्ववत सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles