- दीड वर्षांपासून अनेक बालकांची आरोग्य तपासणीच नाही; वाहनाअभावी पथक उशिरा, आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह
सावंतवाडी : जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाने सुरू केलेला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अक्षरशः ‘रामभरोसे’ सुरू असल्याचा आरोप होत आहे. मळेवाड-कोंडुरे गावातील अनेक अंगणवाड्यांमध्ये तब्बल दीड वर्ष उलटूनही बालकांची नियमित आरोग्य तपासणी झालेली नसल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या कार्यक्रमांतर्गत जन्मदोष, विविध आजार, पोषणातील कमतरता आणि विकासातील विलंब (4 Ds) यांचे निदान करून बालकांना मोफत उपचार दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात तपासणी पथके वेळेवर न पोहोचल्यामुळे अनेक निष्पाप बालके या महत्त्वाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
आज मळेवाड गावातील दोन अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी पथक येणार होते. मात्र दुपारचे बारा वाजूनही पथक दाखल झाले नाही. याबाबत संपर्क साधला असता, “आमच्याकडे शासकीय वाहन नसल्याने खाजगी वाहनाने यावे लागते, त्यामुळे उशीर होतो,” असे स्पष्टीकरण पथकातील डॉक्टरांनी दिले.
या उत्तरामुळे आरोग्य विभागातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. बालकांच्या आरोग्यासारख्या संवेदनशील विषयात जर वाहनासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसेल, तर ही यंत्रणा खरोखरच ‘सलाईनवर’ असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याचबरोबर, या पथकाने आतापर्यंत किती बालकांची तपासणी केली, किती जणांवर उपचार करण्यात आले, किती दिव्यांग किंवा जन्मदोष असलेल्या बालकांची नोंद करून त्यांच्यावर पुढील उपचार झाले, याची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी मळेवाड-कोंडुरेचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकारात तातडीने सुधारणा झाली नाही, तर सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर गावातील बालके व त्यांच्या पालकांसह बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा ठाम इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे.
बालकांच्या आरोग्याशी संबंधित योजनाच जर दुर्लक्षित राहणार असतील, तर ‘निरोगी बालपण’ या शासनाच्या संकल्पनेचे काय होणार? असा सवाल आता सर्वसामान्य पालकांकडून उपस्थित केला जात आहे.



