मुंबई : भाजप नेते निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी खासदार निलेश राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या वर्षा बंगल्यावर दुपारी 1 च्या सुमारास ही भेट झाली. निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
निलेश राणे यांच्या सोबत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अर्धा तासाच्या चर्चा नंतर निलेश राणे वर्षा बंगला मधून बाहेर निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर येत्या दोन दिवसात निलेश राणे यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निलेश राणेंच्या प्रवेशावर शिंदेंचे नेते यापूर्वी काय काय म्हणाले?
निलेश राणे शिवसेने येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. भाजपमधून येणाऱ्याचे आम्ही स्वागत करतो, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते. तर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणे हे उमेदवार असतील. मात्र कोणत्या पक्षातून असतील हे स्पष्ट नाही. यावर बोलताना दीपक केसरकर यांनी निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच आहे. मात्र युतीमध्ये एकमेकांचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. पालघरमध्ये असं करण्यात आले होते. आमची युती एवढी घट्ट आहे की यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील.
कोकण राखण्यासाठी महायुतीत खांदेपालट करण्याची तयारी –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. शिवाय भाजपने 99 जागांवर उमेदवार देखील जाहीर केले आहेत. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. नारायण राणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं या चर्चाना उधाण आले आहे. निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी या पूर्वीच दिली होती. दरम्यान आज निलेश राणेंसह तळ कोकणातील प्रमुख नेते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर या चर्चेसाठी एकत्र आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे निलेश राणे लवकरच शिवसेनेत पक्ष प्रवेश करून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


