सावंतवाडी : येथील माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब हे उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार देखील शिवबंधनात अडकणार असल्याचे त्यांनी सांगितले .
‘जेथे माजी खासदार निलेश राणे तेथे आम्ही’, असे आमचे सूत्र असून उद्या कुडाळ येथील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करतील, तेव्हा संजू परब यांच्यासह त्यांचे सहकारी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
दरम्यान कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाटेला आल्यामुळे या ठिकाणी इच्छुक असणारे माजी खासदार निलेश राणे यांना शिंदे गटात प्रवेश करणे गरजेचे होते. त्याप्रमाणे ते उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतील. तब्बल वीस वर्षानंतर निलेश राणे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब करणार आहेत. यादरम्यान त्यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संजू परब आणि त्यांचे मित्र देखील निलेश राणे यांच्यासोबत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन बांधतील, असे कळविण्यात आले आहे.


