सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा अतिशय सुसंस्कृत, सुज्ञ आणि समृद्धीचा वारसा लाभलेला मतदार संघ आहे. सावंतवाडी मतदारसंघाला स्वर्गीय राजे शिवराम राजे भोसले यांच्यापासून समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र अलीकडे या मतदारसंघात दोन अनिष्ट प्रवृत्ती घोंघावत आहेत. मात्र येथील जनता अतिशय सुज्ञ आहे, अनिष्ट प्रवृत्तींना येथे थारा नाही असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. श्री. केसरकर हे आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब, बाबू कुडतरकर, ॲड. नीता सावंत आदि उपस्थित होते.
यापुढे फक्त कोकणची जबाबदारी स्वीकारेन : मंत्री दीपक केसरकर
यावेळी पुढे बोलताना मंत्री केसरकर म्हणाले , मला ज्या कोकणने भरभरून दिले, त्या सावंतवाडी मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींचे उपकार मी कधीही विसरणार नाही. त्यांचे कायम ऋणात राहील आणि आगामी काळात मी आमच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की, मला राज्याची नव्हे तर फक्त माझ्या कोकणची सेवा करण्याची जबाबदारी द्यावी. असे नमूद करताना त्यांनी पुढे सांगितले की, माझ्या मंत्री काळात मी तब्बल 66 हजार शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसेच माझ्या काळात राज्यातील सर्वात मोठी 30 हजार शिक्षणसेवकांची भरती करण्यात यशस्वी ठरलो, असे सांगत असताना त्यांनी आपल्या एकूण कारकीर्दीत केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडला. मुंबईचा कायापालट पालकमंत्री म्हणून करू शकलो, याबाबत मी समाधानी असून माझ्यावर साईबाबांची कृपा असल्यामुळे आणि जनतेचे प्रेम असल्यामुळे हे सगळे करू शकलो, असेही त्यांनी नमूद केले.
भूमाफियांकडून होणार पैशांचा पाऊस.! : दीपक केसरकर
दरम्यान पुढे बोलताना मंत्री केसरकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघात भूमाफियांकडून होणार पैशांचा पाऊस होणार असला तरी येथील जनता त्यांना थारा देणार नाही. पुढे बोलताना मंत्री केसरकर यांनी सांगितले की आगामी निवडणुकीत भूमाफियांचा आणि अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा जनतेच्या जमीनीवर नजर आहे. त्यामुळे आपण सावधान राहणे गरजेचे आहे. कमी किमतीत शेतकऱ्यांना गंडा घालून कोट्यावधी रुपयांची कमाई करणारे धनदांडगे आपल्या या अनैतिक कमाईतून आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत. येथील जनता आणि श्री देव पाटेकर कधीही सहन करणार नाही, असे सांगत त्यांनी पैशाने लोकांना विकत घेणारे कधीही यशस्वी होणार नाहीत, असा दावा केला.


