Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

ओस पडलेली ग्रंथालये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू.! : मंगेश मसके ; सावंतवाडी तालुक्यातील ग्रंथालयांची केली पाहणी.

सावंतवाडी : आजच्या काळात ग्रामीण भागात ग्रंथालय चळवळ अविरत सुरू ठेवणे खूप जिकरीचे आहे. आज वाचक वर्ग कमी होत चालला आहे, अशा स्थितीत नीटनेटक्या पद्धतीने गावागावात, उत्तम प्रकारे ग्रंथालय चळवळ सुरू आहे.  जिल्ह्यातील अनेक भागात ग्रंथालये दर्जेदार कार्य करत आहेत, ज्या भागात ग्रंथालय चळवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी ग्रंथालये आम्ही शोधून पुन्हा ती प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू अशा शब्दात जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांनी गौरवोद्गार कलंबिस्त येथे काढले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुकानिहाय गावागावातील ग्रंथालयांची तपासणी व पाहणी अभियान सुरू करण्यात आले आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण या तालुक्यातील ग्रंथालयांची पाहणी करण्यात आली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयतर्फे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त झालेले जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव विठ्ठल कदम, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोकण विभागीय प्रतिनिधी भरत गावडे यांचाही सन्मान करण्यात आला.  यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक सतीश गावडे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय हे गावात वीस वर्षांपूर्वी सुरू करणारे संस्थापक सचिव अॅड. संतोष सावंत यांची जिल्हा ग्रंथालय संघावर संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष व माजी सरपंच अनिता नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी. सत्काराला बोलताना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके  म्हणाले, सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागात कलंबिस्त ह्या सैनिकी परंपरा असलेल्या गावात गेली वीस वर्ष उत्तम प्रकारे ग्रंथालय चळवळ राबविण्यात येत आहे. याबद्दल सर्व संचालक मंडळ यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तालुकास्तरीय ग्रंथालय पाहणे अभियानामध्ये अनेक ग्रंथालय आज उत्तम प्रकारे गावागावात सुरू आहेत. ही चळवळ सामाजिक प्ररणेतून  सुरू आहे. ज्या भागात ग्रंथालय चळवळ बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशी ग्रंथालये आम्ही शोधून पुन्हा ती प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी आम्ही निश्चितपणे जिल्हा ग्रंथालय संघ सर्वतोपरी अशा ग्रंथालयांना प्रोत्साहन देईल.  तरी अशा ग्रंथालयाच्या अध्यक्षांनी जिल्हा संघाकडे व तालुका प्रतिनिधीकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक अॅड. संतोष सावंत म्हणाले, खरंतर माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला जिल्हा ग्रंथालय संघाच्या संचालक पदावर संधी मिळाली, याचे सर्व श्रेय जिल्हा ग्रंथालय संघाच्या सर्व टीमला देतो. पण हा सन्मान खऱ्या अर्थाने माझ्या कलंबिस्त गावाचा आहे. ज्या ग्रंथालयाच्या माध्यमातून मी साहित्य व ग्रंथालय चळवळीत काम करू शकलो, त्या ग्रंथालयाच्या सर्व संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळे मी जिल्हा ग्रंथालय संघाचा संचालक होऊ शकलो. आणि आज माझा सन्मान होतो आहे, हा सन्मान ग्रंथालयाचा आहे.

यावेळी साहित्य मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त झालेले विठ्ठल कदम, भरत गावडे, राजन पांचाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रूपा सावंत, उपाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, संस्थेचे सचिव अनिल उर्फ भाई सावंत, संचालक मीनल जंगम, ग्रंथपाल दीपश्री जाधव आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यात सांगेली. माजगाव, कुणकेरी, आंबोली, दाणोली, मळगाव, वेर्ले, सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर आदी ग्रंथालयांना भेटी देण्यात आल्या. यावेळी मळगाव ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खानोलकर यांसह संचालक मंडळ यांनीही उपस्थित जिल्हा ग्रंथालय संघाच्या टीमच्या उपक्रमाचे कौतुक केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles