मालवण : मालवण येथे होणाऱ्या दुसऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कविता रसग्रहण स्पर्धेत ओरोस येथील वैदेही विलास आरोंदेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मालवण येथील दीपक धर्माजी जाधव यांनी द्वितीय, तर सावंतवाडी येथील सृष्टी प्रशांत पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. लक्ष्मी लक्ष्मण धारगळकर (सावंतवाडी) आणि विजय चंद्रकांत ठाकर (दोडामार्ग) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर झाली.
ही स्पर्धा रविवारी श्रीराम वाचन मंदिर सभागृहात झाली. स्पर्धकांना कवी नारायण सुर्वे यांची एक कविता किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक अखंड निवडून त्याचे रसग्रहण सादर करायचे होते.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला तीन हजार रुपये, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट, द्वितीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट, तर तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये, स्मृतिचिन्ह व ग्रंथभेट देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ दोन क्रमांकांच्या विजेत्यांना प्रत्येकी पाचशे रुपये व ग्रंथभेट देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. एन. डी. कार्वेकर आणि प्रा. मिलिंद कासार यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त प्रा. प्रवीण बांदेकर, सिंधुदुर्ग साहित्य संघाचे कार्याध्यक्ष विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर आणि श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे उपस्थित होते.
प्रास्ताविक विठ्ठल कदम यांनी केले, तर स्पर्धेविषयीची माहिती प्रा. प्रवीण बांदेकर यांनी दिली. मालवण येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण साहित्य संमेलनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश मोंडकर यांनी आभार मानले. यावेळी कवयित्री मंगल नाईक-जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



