दडपशाहीविरोधात कवीने सत्याची बाजू मांडणे गरजेचे : वीरधवल परब. ; सावंतवाडीत ५० वे कोजागरी कवी संमेलन उत्साहात.

​सावंतवाडी :  “कवीच्या हातात मोठी ताकद असते. ती ताकद किती मजबूत आहे आणि तिचा वापर कसा करावा, हे त्याच्या नैतिक धैर्यावर अवलंबून असते. सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय घटनांवर कवीने कवितेतून परखड प्रतिक्रिया उमटवायला हवी, तरच त्या कवितेला खरा अर्थ उरतो. आज दहशत, दडपशाही आणि आवाज दाबण्याची वृत्ती बळावत असताना, कवीने सत्तेच्या विरोधी बाकावर बसून सत्याची बाजू ठामपणे मांडली पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी वीरधवल परब यांनी केले.
​सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर व सिंधुदुर्ग साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५० व्या सुवर्णमहोत्सवी कोजागरी कवी संमेलनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
​पावसाची हजेरी अन् कवितांचा पाऊस
​गेले कित्येक दिवस दडी मारलेल्या पावसाने कोजागरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दमदार हजेरी लावली. कवी वसंत सावंत यांनी सुरू केलेल्या या परंपरेला जणू निसर्गानेही हजेरी लावून गारवा निर्माण केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कणकवली, कुडाळ आदी भागांतून आलेल्या कवींनी दुष्काळी स्थिती, जमीन विक्री व्यवसाय, निसर्गऱ्हास आणि कोकणचे आजचे वास्तव यावर भाष्य करणाऱ्या कविता सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.

​मान्यवरांची उपस्थिती व दीपप्रज्वलन –
​श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी या संमेलनाचे शानदार उद्घाटन कवी वीरधवल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
​व्यासपीठावर​ प्रा. प्रवीण बांदेकर (संचालक, महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ व साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक)
​रमेश बोंद्रे (कार्यवाह, श्रीराम वाचन मंदिर), ​विठ्ठल कदम (कार्याध्यक्ष, सिंधुदुर्ग साहित्य संघ)​,मनोहर परब (सचिव, साहित्य संघ), ​राजेश मोंडकर (संचालक) उपस्थित होते.
​या प्रसंगी कवी वीरधवल परब यांचा शाल व श्रीफळ देऊन रमेश बोंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना प्रा. प्रवीण बांदेकर यांनी “कवी वसंत सावंत यांनी सुरू केलेली ही ५० वर्षांची परंपरा सावंतवाडीकरांनी अखंड जपली आहे,” असे सांगत संमेलनाच्या यशाचा आढावा घेतला.
​अध्यक्षीय भाषणात वीरधवल परब पुढे म्हणाले,
​”कविता ही केवळ रोमँटिक वातावरण निर्मिती नसून, ती एक वैचारिक कृती आणि चिंतन आहे. आज समाजात दहशत आणि दडपशाहीचे वातावरण असताना कवीला सामाजिक प्रश्नांपासून बाजूला पळ काढता येत नाही. कवीने खंबीरपणे उभे राहून सत्य प्रगट केले पाहिजे.”

​श्रुती राऊळ,  तन्वी परब यांचा सत्कार!
​संमेलनात ‘इरी इरी पापरी’, ‘दुष्काळ’, ‘शाळा’, ‘पापाचा घडा’, ‘मरण बरं’, ‘नाते’, ‘डोंगर खचतो आहे’, ‘पाणी’ अशा विविध विषयांवरील कविता सादर करण्यात आल्या.
​ कवी राजेश कदम व तन्वी परब यांनी आपल्या उत्कृष्ट व ओघवत्या निवेदनाने सलग दोन तासांहून अधिक काळ श्रोत्यांना खिळवून ठेवले.
​उत्कृष्ट कविता वाचनाबद्दल लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी (सावंतवाडी शाखा) च्या कर्मचारी श्रुती राऊळ आणि ‘तरुण भारत डिजिटल – संवाद’च्या तन्वी परब यांना पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
​या संमेलनात भाऊ गोसावी, श्रुती राऊळ, तन्वी परब, किशोर वालावलकर, ॲड. नकुल पार्सेकर, मनोहर परब, प्रा. कौलापुरे, वंदना करंबेळेकर, श्रद्धा नाईक, योगिता शेटकर, शायरी ठाकूर, श्वेतल परब, मनीषा पाटील, सरिता पाटील, सरिता पवार, विठ्ठल कदम आदी कवींनी काव्यवाचन केले. या वेळी मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles