वैभववाडी : शैक्षणिक वर्ष सन २०२४/२५ मधील मुंबई विद्यापीठाचा विभागीय युवा महोत्सव दि. ५ ऑगस्ट रोजी भोसले कॉलेज ऑफ फार्मसी सावंतवाडी, सिंधुदुर्ग या ठिकाणी संपन्न झाला. या युवा महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये सहभाग घेऊन उज्वल यश संपादन केले. यामध्ये साहित्य, ललित कला, नाट्य, लोकनृत्य, लोकगीत अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कला स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कला प्रकारांमध्ये आपला सहभाग घेतला होता.

यामध्ये कु. हर्ष संजय नकाशे हा भारतीय शास्त्रीय गायनामध्ये प्रथम, भारतीय सुगम संगीतामध्ये द्वितीय, नाट्य संगीतामध्ये द्वितीय, कु. रश्मी मालंडकर हिने वक्तृत्व स्पर्धा बी ग्रुप यामध्ये द्वितीय, कु. तुषार पार्टे हा वक्तृत्व स्पर्धा ग्रुप ए यामध्ये तृतीय, कु. कुणाल तीवटने हा ऑन द स्पॉट पेंटिंग मध्ये द्वितीय व कोलाज मध्ये उत्तेजनार्थ अशी बक्षिसे मिळून या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य प्राध्यापक अशा सर्वांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागानचे विशेष मार्गदर्शन लाभले.


