ठाणे : राजकारणात कधी कधी वयानुसार किंवा मग बुध्दीमत्तेनुसार पदं मिळताना दिसतात. मात्र, 1990 च्या बॅचचे असूनही राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मागे राहिलो, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित, त्यांच्या राजकीय वाटचालाची माहिती देणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाचे अनावरण झाले. या कार्यक्रमासाठी अजित पवारांनी ही सल बोलून दाखवली आहे.
या कार्यक्रमावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस 1999 साली आमदार झाले. एकनाथ शिंदे 2004 साली आमदार झाले. विधानसभेत मी या दोघांना सिनियर आहे. मी 1990 च्या बॅचचा आमदार आहे. मात्र, हे सगळे माझ्या पुढे गेले आणि मी मागे राहिलो.
पक्षफुटीवर बोलताना अजित पवार पुढे म्हणाले, ज्या त्या गोष्टी त्या-त्या वेळी घडतात. एकनाथ शिंदे एवढे आमदार घेऊन आले; पण मला मुख्यमंत्रिपद देणार हे सांगितले असते तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जे नशिबात असते तेच घडते. शिंदे हे जास्तीत जास्त लोकांच्या पत्रांवर सह्या करणारे मुख्यमंत्री आहेत, अशी कोपरखळी देखील अजित पवारांनी शिंदेंना मारली आहे.
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. त्यामुळे फाईलवर ते असे काही लिहतात की, फाईल फिरून त्यांच्यापर्यंतच आलीच पाहिजे. मी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री झालो. अजित पवार (Ajit Pawar) तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता व पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहात. पण, शिंदे यांचा रेकॉर्ड तुटणे शक्य नाही. सत्ताधारी पक्षातून बाहेर पडून त्यांनी विरोधी पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याची हिंमत दाखवली. त्यामुळे ते पुस्तकाचे नायक बनले, असा चिमटा यावेळी फडणवीस यांनी अजित पवारांना काढला आहे.
“ये तो ट्रेलर है… पिक्चर अभी…” – एकनाथ शिंदे
ज्या व्यक्तीचं योगदान देऊन झालं आहे त्याचं जीवन चरित्र प्रकाशित होतं. मात्र, माझ्यावरील हे पुस्तक म्हणजे माझ्या राजकीय जीवनाचा क्लायमॅक्स नाही. इंटरव्हलही नाही. तर हे पुस्तक ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी मुख्यमंत्रीपदासाठी दंड थोपटल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.