Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

बंडोबा थंड होणार का?, ३ वाजेपर्यंत निकाल लागणार.! ; भुजबळ, शेट्टी ते मलिक, सरवणकर, मविआ, महायुतीकडून कसरत!

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटकपक्षांतील नेत्यांनी बंडाचं निशाण उभारलं आहे. त्यामुळे जवळजवळ सर्वच पक्षांची अडचण वाढली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची (4 ऑक्टोबर) शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज दुपारी तीन वाजेपर्यंत कोणते बंडोबा थंड होणार? कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार? तर कोण निवडणूक लढवण्यावर ठाम राहणार? हे स्पष्ट होणार आहे.

अनेक बड्या नेत्यांचे बंड, पक्षांची डोकेदुखी –

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमधील अनेक नेत्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. काही नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलंय, तर काही नेत्यांनी आम्हाला पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला असून कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका घेतली आहे. सध्या दिवळीचा सगळीकडे उत्सव आहे. दिवाळीत नेतेमंडळी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. मात्र यावेळच्या दिवाळीत वेगवेगळ्या पक्षांच्या शीर्ष नेतृत्त्वाकडून बंडखोरांचे बंड थंड करण्यासाठी कसरत चालू आहे. 3 तारखेपासून बडखोर नेत्यांशी चर्चा करून जमेल त्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न पक्षांकडून केला जातोय. या प्रयत्नांना यश येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदा सरवणकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष –

राज्यात भाजपाचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) नवाब मलिक, समीर भुजबळ, सदा सरवणकर आदी बड्या नेत्यांनीही बंडखोरी केलेली आहे. त्यांच्याशी आज शेवटची चर्चा केली जाईल. त्यानंतर हे मंडळी निवडणूक लढवणार की माघार घेणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांनी माहीममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या जागेवर भाजपाने आम्ही मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे काम करणार, अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सरवणकर यांची उमेदवारी मागे घेण्याचा दबाव एकनाथ शिंदे यांच्यावर टाकला जात आहे. त्यामुळे सरवणकर आज उमेदवारी मागे घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गोपाळ शेट्टी काय निर्णय घेणार?

दुसरीकडे बोरिवली या मतदारसंघात भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात शेट्टी आणि फडणवीस यांच्यात चर्चा झालेली आहे. मात्र शेट्टी यांनी त्यांचा निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे ते आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मानखुर्द-शिवाजीनगर या मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनीही पक्षाचा एबी फॉर्म घेऊन ऊमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मलिक यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केलेला आहे. त्यामुळे मलिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अजित पवार यांच्यावर दबाव आहे. तर नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आता मलिक नेमका काय निर्णय घेणार? हे दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

समीर भुजबळ माघार घेणार का?

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव या मतदारसंघातही असाच पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. कोणत्याही परिस्थितीत मी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, मी निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी मध्यस्थी करून समीर भुजबळ यांचा अर्ज मागे घ्यावा, अशी अपेक्षा महायुतीकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता येथे नेमके काय होणार हे दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे.

महाविकास आघाडीतही सारखीच स्थिती –

महाविकास आघाडीमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या साधारण 30 ते 35 नेत्यांनी बंडखोरी करत वेगवेगळ्या जागांवर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या नेत्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी काँग्रेसकडून युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत. शरद पवार यांच्या पक्षातही काही नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे आता दुपारी तीन वाजेपर्यंत कोणाचे बंड थंड होणार? तसेच कोण ठाम राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles