प्रा. रुपेश पाटील
सावंतवाडी : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, सगळीकडे प्रचाराचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारसंघात आपल्या प्रचारासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. सकाळी लवकर उठून आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन मतदार संघातील मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रत्येक जण मेहनत घेताना दिसत आहे. मात्र असे असताना आज सावंतवाडी येथे एक सकारात्मक विचार करणारी घटना घडली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदारकी मिळविलेले दमदार नेते दीपक केसरकर यांनी आपल्या कार्यालयात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत मंत्री दीपक केसरकर आपण केलेल्या विकासा कामाच्या संदर्भात माहिती देत होते. समस्त पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते सकारात्मक उत्तरे देत होते. मात्र असे असतानाच मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे दोन चिमुकले डोळे अत्यंत निरागसपणे लागले होते.
मालवण येथील अश्वथ आशीष देसाई या चिमुकल्याने संपूर्ण पत्रकार परिषदेत अत्यंत संयम ठेवत मंत्री केसरकर यांच्याकडे निरखून पाहिले. त्यानंतर चिमुकला अश्वथ ज्यांच्यासोबत आलेला होता, ते ज्येष्ठ पत्रकार विकास गावकर यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची परवानगी घेऊन अश्वथला त्यांच्याजवळ बोलावले. तेव्हा चिमुकल्या अश्वथने “साहेब, मला आपला ऑटोग्राफ हवा आहे.!” अशी मागणी केली. ते पाहून मंत्री दीपक केसरकर हे सध्याच्या राजकीय वातावरणात धावपळीत असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण हास्य अवतरले. त्यांनी अश्वथला जवळ घेत त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला व आपुलकीने त्याला काही प्रश्न विचारले. तेव्हा मंत्री केसरकरांनी केलेल्या विचारपूस आणि प्रश्नांना अश्वथनेही सुंदर प्रतिसाद दिला.

दरम्यान, यावेळी उपस्थित अनेक पत्रकारांनी आपल्या कॅमेरात हे दृश्य टिपले. मात्र खरी गंमत आहे ती आजच्या धकाधकीच्या युगात आणि प्रचंड ताणतणावात असलेल्या राजकीय वातावरणातही मंत्री दीपक केसरकर हे अत्यंत शांत, संयमी आणि तेवढ्याच आपुलकीने छोट्याशा चिमुकल्या अश्वथची जी आपुलकीने विचारपूस केली ती निश्चितच अनेकांना प्रेरणादायी ठरेल, अशी बाब आहे. एकूणच काय तर आज आपण आपल्या वैयक्तिक ताण-तणावाला बाजूला ठेवून बालकांना जवळ घेऊन त्यांची विचारपूस करणे खूप गरजेचे आहे, असा अत्यंत मौलिक आदर्श मंत्री केसरकर यांनी आपल्या वागण्यातून दाखविला आहे. चिमुकल्या अश्वथ देसाई याचे देखील उपस्थित पत्रकार व मान्यवरांनी यावेळी कौतुक केले. मंत्री दीपक केसरकर यांचे पत्रकार विकास गावकर यांनी आभार मानले.
ADVT –



