कणकवली : महायुती धर्म प्रत्येकाने पाळलाचं पाहिजे. कोणीही वाह्यात बोलू नये आणि वागू नये. महायुती म्हणून आपण राज्यात जनतेचे हित जोपासत आहोत, याची जाणीव ठेवा. महायुतीचा धर्म जो व्यक्ती पाळत नसेल अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुनावले. कणकवली येथे युवा संदेश प्रतिष्ठानच्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात दीपक केसरकर बोलत होते.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी महायुतीचे सिंधुदुर्गातील नेतृत्व म्हणून दीपक केसरकर हे ज्येष्ठ नेतृत्व आम्हाला पुरेसे आहे. दुसऱ्यांची गरज नाही असे सूचित केले होते. आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा आधार घेत दीपक केसरकर पुढे म्हणाले. यापुढे महायुतीचा धर्म पाळला जाईल. आम्ही सर्वजण माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. त्यामुळे तुम्ही सेना सोडली तेव्हा सर्वच लोक तुमच्याबरोबर घेऊ गेला. काही लोक आमच्याकडे सुद्धा ठेवा म्हणजे मतभेद होण्याचा प्रश्नच येणार नाही, असे आमदार नितेश राणे यांना सांगतानाच येत्या काळात हा बदल करा, असे सूचित केले.
राजकारणातील सर्वांनीच राणे साहेबांचे आत्मचरित्र वाचावे. त्यांची प्रेरणा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या पुस्तकातील सर्वाधिक भाग बाळासाहेबांवर लिहिलेला आहे. राणे साहेबांच्या मनात आपल्या गुरुबद्दल असलेले ही प्रेम भावना नेहमीच आमच्यासारख्यांना प्रेरणादायी ठरते. जीवनात मतभेद होऊ शकतात मात्र मनभेद असू नये आणि मतभेद कधी मिटवावे हे माणसाला कळले पाहिजे. अनेक लोक शाळेत जातात म्हणून ते मंत्री होऊ शकत नाही. राजयोग लागतो अशा राजयोगातून माझ्या सारखा माणूस मंत्री झाला. माझ्या लहानपणी शिवराम राजे भोसले सर्वाधिक मतांनी निवडून गेले होते. त्यावेळी ते मंत्री होतील अशी अपेक्षा होती मात्र सर्वांनाच ते पद मिळत नाही. शिवराम राजे भोसले, भाई सावंत, नारायण राणे ही आदर्श व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपण काम केले पाहिजे. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यापदाचा फायदा आपल्या जिल्ह्याला कसा करुन देता येईल, यावर लक्ष दिले पाहिजे. मी ते काम करत आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरु आहेत. असे काम करणारा आमदारांच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना पूर्ण ताकतीने उभी करणार, असा विश्वासही यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.


