पुणे : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा २०२५ साठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवारांना १३ जानेवारी २०२५ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने मंजूर झालेल्या सैनिकी शाळांसह इतर सर्व सैनिक शाळांमधील इयत्ता ६ वी आणि ९ वीच्या वर्गांचा समावेश आहे. देशभरातील सैनिक शाळांमध्ये इयत्ता ६ आणि ९ च्या प्रवेशासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी ओएमआर शीट वापरून ही परीक्षा ऑफलाइन घेण्यात येईल.
इयत्ता ६ वीमधील प्रवेशासाठी, विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२५ रोजी १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असावे. इयत्ता ९ वीतील प्रवेशासाठी, उमेदवाराचे वय ३१ मार्च २०२५ रोजी १३ ते १५ वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे. प्रवेश परीक्षा अर्जात सुधारणा करण्यासाठी १६ ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत मुदत देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://exams.nta.ac.in/AISSEE/ भेट देऊन नोंदणी करावी आणि अर्ज करावा, अस आवाहन करण्यात आले आहे.


