सावंतवाडी : आपले राष्ट्रविकासाच्या दिशेने झोपावत आहे. यात युवाशक्तीची मोठी ताकद आहे. विद्यार्थी परिषद म्हणजे शील, शिस्त याची शिकवण देणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थी दहशत असताना राष्ट्र विकासाची कास जरूर धरा, मात्र आपल्याकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याला वेळीच ठेचण्याची ताकदही आपल्या अंगी बाळगा!, अलीकडच्या काळात आमच्याकडे कोण वाकड्या नजरेने पाहत आहे, याचाही सारासार विचार करा, असा मौलिक सल्ला महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथे दिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 59 व्या कोकण प्रांत अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक व युजीसीचे सचिव डॉ. मनीष जोशी, स्वागत समिती अध्यक्ष अतुल पै काणे, स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुदगीकर, प्रांत मंत्री राहुल राजोरिया, सावंतवाडी शहराध्यक्ष डॉ. साईनाथ सितापवर, शहर मंत्री स्नेहा धोटे आदी उपस्थित होते.
दरम्यान पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले, आपले राष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहिले पाहिजे. पहिल्याच दिवशी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्याला लाभलेल्या 720 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ कोण खरे आणि कोण खोटे मत्स्य व्यावसायिक आहेत?, याची शहानिशा करायला सांगितले आहे. तसेच गुगल लोकेशनद्वारे संपूर्ण सागर किनारपट्टीवरची माहिती देण्यासाठी सूचना केल्या आहेत. आगामी काळात किनारपट्टीवर कोण मस्ती करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही!, असाही इशारा त्यांनी आवर्जून दिला. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्राचा नागरिक म्हणून हे राष्ट्र भगवामय आणि सुरक्षित राखण्यासाठी आपण सर्व त्या तयारीला सामोरे जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचाही उल्लेख केला.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांताच्या 59 व्या अधिवेशनाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर, भोसले नॉलेज सिटी येथे प्रारंभ झाला. राज्यभरातून तब्बल आतापर्यंत तब्बल 700 विद्यार्थी येथे दाखल झाले आहेत.
मंत्री नितेश राणेंची युवाईच्या मनात ‘हिंदू आयडॉल’ ही क्रेझ-
दरम्यान आपल्या भाषणाच्या प्रारंभी मंत्री नितेश राणे यांनी ”वंदे मातरम, वंदे मातरम!”, “बोलो भारत माता की जय.!” आणि भाषणानंतर ‘जय श्रीराम!’, असा जोरदार नारा दिला. यावेळी उपस्थित असलेल्या गोवा, कारवार संपूर्ण कोकणातून सावंतवाडी येथे दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मंत्री नितेश राणे यांना भरभरून प्रतिसाद दिला. भाषण संपल्यावर मंत्री नितेश राणे यांनी सभामंडपात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत सेल्फी घेत तर काहींनी फोटो काढून आपल्या या युवाईच्या आयडॉल नेत्यासोबत फोटोसेशनचा आनंद लुटला. यावरून एक नक्की झाले की ‘हिंदूंचा गब्बर’ अशी ओळख निर्माण झालेली असताना युवाईच्या मनामध्येही मंत्री नितेश राणे हे ‘हिंदू आयडॉल’ असल्याचे सिद्ध झाले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत समिती सचिव व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहा धोटे यांनी केले तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष प्रा. डॉ. साईनाथ सितापवार यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी स्वागत समिती सदस्य प्रभाकर सावंत, कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोंसले, भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत भोंसले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, उदय नाईक, आनंद देवगी, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, ऐश्वर्या कोरगावकर, डॉ. प्रसाद देवधर, अॅड. सुषमा खानोलकर, डॉ. राजशेखर कार्लेकर, प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, देवेन सामंत, शिवाजी भावसार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.