मंत्री म्हणून दीपक केसरकर यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद.! – आमदार निलेश राणे.
आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांचा रोटरी इनरव्हील क्लब तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून सत्कार.!
सावंतवाडी : आज मला सावंतवाडीत पर्यटन महोत्सवाला पहिल्यांदाच येण्याचा योग आला. दीपक केसरकर यांनी प्रेमाने मला इथे बोलावलं त्यामुळे सावंतवाडी पर्यटन महोत्सव पहिल्यांदाच मला बघता आला. अतिशय दिमाखदार असा हा महोत्सव आपण दरवर्षी साजरा करत आहात. इथून पुढे हा महोत्सव साजरा करत असताना जर माझा कुठे खारीचा वाटा मिळावा असं वाटलं तर तुम्ही मला हक्काने सांगा मी तुमच्यासोबत नक्कीच आहे. जेव्हा हाक माराल तेव्हा सावंतवाडीसाठी उपलब्ध राहीन, असा विश्वास कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
आ. दीपक केसरकर मित्रमंडळ, रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ सावंतवाडी महोत्सव २०२४’ चे उद्घाटन कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते तर माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थितांना त्यांनी संबोधित केले.

ते म्हणाले, दीपक केसरकर यांनी मतदारसंघात अनेक गोष्टी सुरू केल्या. त्या मागची त्यांची संकल्पना ही फार मोठी आहे.
या मतदारसंघात सर्वाधिक निधी आणण्याचं काम केसरकर यांनी केलं. सिंधूरत्नच्या माध्यमातून देखील त्यांनी फार मोठं काम केलं आहे. गावागावात जे विजेचे ट्रांसफार्मर दिसत आहेत ते त्यांच्या माध्यमातूनच मंजूर झाले आहेत. निधी आणणं हे एवढं सोपं नसतं त्यासाठी फार मोठं कौशल्य लागतं. विधिमंडळात २८८ आमदार असतात तर अनेक मंत्री असतात त्यातून आपल्या मतदारसंघासाठी व आपल्या जिल्ह्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. आम्ही आमच्या कुठे मतदारसंघात निधीचा पाऊस पडला असं म्हणत होतो मात्र सावंतवाडीत केसरकर यांनी फार मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे हे कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले.
मागील वेळी ते एका खात्याचे मंत्री होते. मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. तासनतास अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते काम करीत असत. एकदा मी चीपी विमानतळावरून मुंबई येथे जात असताना मला आलेला अनुभव आहे. केसरकर त्यावेळी खास मुंबईहून मीटिंगसाठी आले होते त्यांनी विमानतळाच्या वरील सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली व तिथूनच ते मुंबईला परत गेले. मीटिंगसाठी मुंबईहून येणारे अनेक मंत्री बघितले मात्र आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी एवढा वेळ देणारा मंत्री जवळून पाहता आला. मंत्री म्हणून सर्वात जास्त तास बैठक घेण्याचा रेकॉर्ड दीपक केसरकर यांचा आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
२००९ साली मी जेव्हा पहिल्यांदा खासदार झालो त्यावेळी माझ्या पहिल्या निवडणूकीत २८ दिवस व्हॅनमधून दिवसरात्र प्रचार करणारे दीपक केसरकर असून त्यांची खूप मोठी मदत त्यावेळी आम्हाला मिळाली होती. दिलेला शब्द पाळण्याची त्यांची खासियत आहे. तसेच आपल्या मतदारसंघावर आपल्या जिल्ह्यावर त्यांचा विशेष प्रेम राहिले आहे. यासाठीच अशा प्रकारचे महोत्सव साजरे करून पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा ही त्यांची त्या मागची संकल्पना आहे, असेही ते म्हणाले.
सावंतवाडी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांचा यावेळी सावंतवाडीवासीयांच्या माध्यमातून विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे देखील त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच सावंतवाडी वासी यांच्या माध्यमातून आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचा सत्कार केला. रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून देखील आ. निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांना सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केलं. दीपक केसरकर चांगलं काम मतदारसंघात करत आहेत. आयुष्यभर दीपक केसरकर यांना विरोध केला. पण, सोबत गेलो तेव्हा सावंतवाडीच्या विकासासाठी झपाटून काम करणारा हा माणूस आहे हे समजल. सावंतवाडीत पहिला महोत्सव सुरु करण्याच श्रेय दीपक केसरकर यांना जात. निलेश राणे यांनी आमदार म्हणून लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विधानसभेत मांडले. आमदार कसा असावा हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. तुम्ही आमचे नेते आहात याचा मला गर्व आहे असं प्रतिपादन शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक धुरी, जुईली पांगम, शुभम धुरी यांनी केलं.
यावेळी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बाबू कुडतरकर, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक संजय पेडणेकर, सुरेंद्र बांदेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, श्री. सावंत, दीपक केसरकर मित्रमंडळाचे सदस्य गजानन नाटेकर, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, निकिता आराबेकर, राजन रेडकर, नंदू शिरोडकर, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद भागवत, सचिव सुभोध शेलटकर, खजिनदार राजन हावळ, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजेश घाटवळ, रोट्रॅक्ट अध्यक्ष निकिता आराबेकर, प्रणय गावडे, पूर्वा निर्गुण, पृथ्वीराज चव्हाण, शुभम सावंत, सिद्धेश सावंत, भावेश भिसे, सानिका गावडे,दर्शना बाबर देसाई, राजन हावळ, माजी नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, किरण नाटेकर, किर्ती बोंद्रे, शर्वरी धारगळकर, सत्यवान बांदेकर, परिक्षीत मांजरेकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


