सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ कबुलायतदार गांवकर जमीन प्रश्नावर येत्या 14 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत चौकुळ जमीन प्रश्न सुटेल, अशी माहीती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मुंबई मंत्रालयातून दूरस्थ प्रणालीद्वारे मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दरम्यान, मंत्री दीपक केसरकर म्हणाले, चौकुळच्या ग्रामस्थांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 14 ऑगस्ट रोजी ४.वा. सह्याद्री अतिथी गृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. आंबोली, गेळेचा प्रश्न सुटला आहे. मात्र, चौकुळचा प्रश्न थोडा वेगळा आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची त्यांची मागणी होती. यात मुख्य मुद्दा कबुलायतदार जमिनींवर लागलेली वनसंज्ञा रद्द करण हा आहे. वन व महाराष्ट्र शासन लागलेल्या जमिनींच एकत्रित वाटप व्हावं अशी ग्रामस्थांची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत सकारात्मक निर्णय देतील. जमीनीवर लागलेली वनसंज्ञा हटवली जाईल व ग्रामस्थांना कबुलायतदार जमीनींच देखील वाटप होईल. चौकुळच्या निर्णयान हा प्रश्न पुर्णपणे संपुष्टात येईल असं मंत्री केसरकर म्हणाले.


