नागपूर : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला आज 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील सलामीचा सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जोस बटलर याच्याकडे इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधीच पाहुण्या इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
जो रुटचं कमबॅक –
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हनमध्ये अनुभवी जो रुट याचं कमबॅक झालं आहे. रुट तब्बल 15 महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये खेळणार आहे. रुटने अखेरचा एकदिवसीय सामना हा भारतातच खेळला होता. रुटने वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाविरुद्ध सामना खेळला होता. तसेच या मालिकेत जोस बटलरऐवजी फिल सॉल्ट हा विकेटकीपरच्या भूमिकेत असणार आहे. तसेच पेस त्रिकुटात जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स आणि साकिब महमूद या तिघांना संधी मिळाली आहे.
साकिब महमूद याला व्हीझामुळे अडचण झाली होती. मात्र त्यानंतर साकिब टीम इंडियाविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात खेळला. साकीबने पुण्यात झालेल्या या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 8.75 च्या इकॉनॉमीने 35 धावा देत 3 मोठ्या विकेट्स घेतल्या होत्या. साकीबने कॅप्टन सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या तिघांना बाद केलं होतं. मात्र आता फॉर्मेट वेगळा आहे, ठिकाण वेगळं आहे. त्यामुळे टीम इंडियाचे गोलंदाज वेगळ्या फॉर्मेटमध्ये त्याच गोलंदाजासमोर कसे खेळतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.


