प्रयागराज : महाकुंभामुळे प्रयागराजमध्ये कमालीची गर्दी वाढत आहे. दरम्यान, एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या गर्दीमुळे, प्रयागराज संगम स्टेशन पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. प्रयागराज संगम स्टेशन हे संगमच्या सर्वात जवळ आहे. स्टेशनची एकूण क्षमता १००० ते २००० लोकांची आहे, परंतु गर्दीमुळे स्टेशन बंद करण्यात आले आहे. तथापि, रेल्वे सेवा थांबवण्यात आलेली नाही.
सर्व स्थानकांवर आरपीएफ कर्मचाऱ्यांची तैनाती वाढवण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन करता यावे म्हणून अधिकाऱ्यांना स्टेशनवरच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी दिवसभर १५० हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या. तर रात्रीच्या वेळी सुमारे २०० विशेष गाड्या चालवल्या गेल्या.
माघ पौर्णिमा २०२५ वसंत पंचमीनंतर, महाकुंभाचे पुढील मोठे स्नान माघ पौर्णिमेच्या दिवशी होईल. माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत, महाकुंभ आणि माघ पौर्णिमेच्या शुभ संयोगात स्नान केल्याने अनेक पटींनी जास्त शुभ फळ मिळते. माघ पौर्णिमा १२ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी प्रयागराजमध्ये महाकुंभाचे मुख्य स्नान केले जाईल.
महाकुंभातील शेवटचे मोठे स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी केले जाईल. महाकुंभमेळा देखील याच दिवशी संपेल. महाशिवरात्रीच्या दिवशी त्रिवेणीत स्नान केल्याने शाश्वत लाभ मिळतो. यासोबतच, महादेव भोले शंकर यांचे विशेष आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.
महाकुंभ १३ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाला. हा दिवस पौष पौर्णिमा होता. महाकुंभाचे पहिले अमृत स्नान १४ जानेवारी रोजी, मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण झाले. त्यानंतर २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या निमित्ताने दुसरे अमृत स्नान करण्यात आले. महाकुंभातील तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान वसंत पंचमीच्या दिवशी झाले.
ADVT –




