सावंतवाडी : संत श्रेष्ठ रोहिदास यांनी जात-पात भेदाभेद आणि विषमता निर्मूलनाचे विचार मांडले. मानव जातीच्या कल्याणासाठी सर्व समान असल्याचे त्यांनी आपल्या विचारातून सांगत असताना “प्रभुजी तुम चंदन हम पानी, जाकी अंग अंग बास समानी!” असा संदेश दिला असून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि समाजात एकी निर्माण व्हावी, हे विचार त्यांनी आयुष्यभर मांडले असून त्यांच्या कार्याला सलाम, असे प्रतिपादन संत शिरोमणी रोहिदास यांचे गाढे अभ्यासक पी. बी. चव्हाण यांनी केले. संत रोहिदास सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी संचालक गणेश म्हापणकर यांच्या हस्ते संतश्रेष्ठ रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने त्यांची 648 वी जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बाबुराव चव्हाण, संचालक गणेश म्हापणकर, पी. बी. चव्हाण, मंगेश कदम, मधुरिका चव्हाण, सुलोचना वाडकर, भरत लाखे, पतसंस्थेचे व्यवस्थापक सदानंद चव्हाण, कर्मचारी दशरथ वाडकर, कुमारी निरवडेकर, पिग्मी एजंट नारायण केसरकर यांच्यासह कर्मचारी मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पतसंस्थेचे व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांनी केले. त्यांनी संत शिरोमणी रोहिदास यांच्याबद्दल माहिती दिली तर शेवटी आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन बाबुराव चव्हाण यांनी केले.


