सावंतवाडी : मालवणी साहित्यिका पूर्णिमा गावडे – मोरजकर यांना नट वाचनालय बांदा येथे प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी युवा मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा प्रकाश गावडे-मोरजकर यांना जाहीर करण्यात झाला होता. शुक्रवार दिनांक १४/२/ २०२५ रोजी नेरुरकर जयंतीचे औचित्य साधून वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सौ. पूर्णिमा गावडे – मोरजकर ह्या मालवणी साहित्यिका असून त्यांचे ‘गजाल गाथण’ हा मालवणी कथासंग्रह हा नुकताच प्रकाशित झाला आहे. त्या स्तंभलेखिका असून समाज माध्यमावर त्यांचे अनेक मालवणी ब्लॉग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बांदा येथील नट वाचनालयात प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांनी बांदा गावाला ‘पिंपळगाव’ ही उपमा दिली होती. त्यांच्या स्मृतिदिना निमित्त दरवर्षी एका नवोदित साहित्यिकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या कार्यक्रमाच्या वेळी सर्व साहित्यप्रेमी व पूर्णिमा गावडे यांचे आई – वडील, बहीण त्याचप्रमाणे त्यांचा मित्र-परिवारही उपस्थित होता.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


