मुंबई : टीव्ही विश्वाची क्वीन एकता कपूर वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी चित्रपट आणि टीव्ही निर्माती एकता कपूर हिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी तक्रारीचा तपास करण्याचे आदेश मुंबईतील एका न्यायालयाने शनिवारी दिले. ही तक्रार एकता कपूरच्या एका वेब सीरिजबाबत केली होती, ज्या शोमध्ये भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हिंदुस्तानी भाऊने केली तक्रार –
वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना 9 मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या कलमांतर्गत दंडाधिकारी फौजदारी तक्रारीची चौकशी करू शकतात किंवा पोलिसांना तसे करण्याचे निर्देश देऊ शकतात. सांगायचं झालं तर, एकता कपूर हिच्याविरोधत तक्रार युट्यूबर विकास पाठक म्हणजेच ‘हिंदुस्तानी भाऊ’ ने दाखल केली आहे.
कास पाठक यांनी फक्त एकता कपूर हिच्यावरच नाही तर, याशिवाय एकताचे ओटीटी प्लॅटफॉर्म ऑल्ट बालाजी आणि तिचे आई-वडील शोभा आणि जितेंद्र कपूर यांचीही या तक्रारीत नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
वकील अली काशिफ खान देशमुख यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आरोप करण्यात आला आहे की, ALTBalaji वर प्रसारित झालेल्या वेब सीरिजमध्ये एका लष्करी अधिकाऱ्याला आक्षेपार्ह कृत्य करताना दाखवण्यात आले होते. तक्रारीत म्हणण्यात आलं आहे की, ‘भारतीय लष्कराच्या लष्करी गणवेशात राष्ट्रीय चिन्हासह आक्षेपार्ह कृत्य दाखवून आरोपींनी आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि सन्मानाला ठेच पोहोचवली आहे!’
एकता कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाहीय. यापूर्वी सुद्धा एकता कपूरच्या फिल्म किंवा प्रोजेक्टमधील सीन्सवरुन लोकांनी आक्षेप नोंदवलाय. एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस 2’ सिनेमातील सीन्सवरुन वाद झाला होता. फिल्मचा ट्रेलर युट्यूबवर बॅन करण्यात आला होता. कोणत्या न कोणत्या कारणामुळे एकता कायम वादाच्या भोवऱ्यात असते.


