कणकवली : आजच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक उन्मादाच्या काळात कोकण सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता ही सुटली नाही. त्यांच्या अजरामर कवितेतील खाटीक शब्द सेन्सॉर बोर्डालाही जातीय वाटू लागला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणातील रजनीश राणे आणि अजय कांडर या दोन लेखक कलावंतांनी सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन मुंबईत आयोजित केले असून संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते आणि नारायण सुर्वे यांच्या कवितेचे अभ्यास प्रमोद पवार यांची निवड करण्यात आली आहे. 27 मार्च रोजी रवींद्र नाट्य मंदिरात हे संमेलन रंगणार आहे.
रजनीश राणे यांच्या स्वामीराज प्रकाशन आणि अजय कांडर यांच्या प्रभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर ” सुर्वे मास्तरांचे साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले असून संमेलनाध्यक्षपदी कवी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभ्यासक, ज्येष्ठ अभिनेता प्रमोद पवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे. दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचा स्मृती जागर करणारे हे एकदिवसीय साहित्य संमेलन गुरुवार, २७ मार्च २०२५ रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर मध्ये संपन्न होणार आहे.सकाळी १० ते रात्री १० पर्यंत या संमेलनात नारायण सुर्वे यांच्या गीतांचे शाहिरी गायन, काव्य अभिवाचन, परिसंवाद, मुलाखत, निमंत्रितांचे कवी संमेलन, एकांकिका आणि ” आणखी एक मोहन्जोदारो” या बहुचर्चित लघुपटाचे प्रदर्शन असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.
दरम्यान या संमेलनात मास्तरांची सावली साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी ज्येष्ठ लेखक प्रदीप आवटे, पुणे, लेखिका डॉ.योगिता राजकर , वाई, कवी सुनील उबाळे, छ.संभाजीनगर, कवी सफरअली इसफ, सोलापूर, सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर सिंधुदुर्ग आणि ललित लेखिका सुजाता राऊत मुंबई या साहित्यव्रतींचा ” मास्तरांची सावली ” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
तरी या संमेलनास सर्व साहित्य रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनचे रजनीश राणे आणि प्रभा प्रकाशनचे अजय कांडर यांनी केले आहे.


