सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील पाट तिठा येथे डंपर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातातील संशयित आरोपी वैभव गोपाळ मांजरेकर (रा. हुमरमळा – करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग यांना कुडाळ येथील सहदिवाणी न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. तर अल्पवयीन युवक यश मांजरेकर या १६ वर्षाच्या मुलाला रविवारी सावंतवाडी येथील बाल न्यायालय मंडळात हजर केले असता त्या अल्पवयीन युवकाला परिक्षेस बसण्याची मुभा देण्यात आल्याने त्यानुसार त्या युवकाने पाट हायस्कूल येथे आज सोमवारी दहावीचा पेपर दिला.
पाट तिठा येथे काल रविवारी झालेल्या अपघातात पाट हायस्कूलची दहावीतील विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेतर (वय 16, रा. निवती मेढा, ता. वेंगुर्ले) हिचा डंपरखाली सापडून जागीच दुर्देवी मृत्यू झाला होता.तर दहावीचा पेपर सोडविण्याआधीच मनस्वीवर काळाने घाला घातला.या अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी अल्पवयीन मोटारसायकलस्वार यश मांजरेकर व त्याचे वडील वैभव मांजरेकर व डंपरचालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे संशयित दोन आरोपींना अटक करून कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी देऊन जामीन मंजूर करण्यात आल्याचे निवती पोलिसांनी सांगितले. दरम्यान अल्पवयीन मुलाला सावंतवाडी येथील बाल न्यायालय मंडळ येथे रविवारी हजर केले असता न्यायालयाच्या परवानगीने १६ वर्षाच्या यश मांजरेकर या युवकाने पाट हायस्कूलमध्ये आज सोमवारी दहावीचा पेपर दिला. न्यायालयीन प्रकरणात डंपर चालकाच्या वतीने ॲड. पंकज आपटे तर श्री. मांजरेकर यांच्या वतीने ॲड. राजीव बिले यांनी काम पाहिले.


