चिपळूण : चिपळूणमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे. गुहागर बायपास मार्गावरील बारदानाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की, आगीच्या धुराचे लोळ बाहेर पडताना दिसत होते.
ही घटना समजताच चिपळूणवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली, तर चिपळूण नगरपरिषद व लोटे औद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दलाने देखील धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र, भर दुपारी आग लागल्याने ही आग सातत्याने भडकत होती. मात्र तोपर्यंत आगीमध्ये गोडाऊनमधील बारदान जळून खाक झाले. एकंदरीत गोदामातील मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या ही आग कशाने लागली? याचा तपास पोलीस करत आहेत.


