सावंतवाडी : इतिहास नेहमी मृत असतो पण तोच इतिहास जिवंत कसा होतो ? तर वर्तमान काळातील कोणतीही मानव मुक्तीची लढाई असेल किंवा शोषण मुक्तीची लढाई असेल, क्रांती प्रतिक्रांतीची लढाई असेल या दोन्ही बाजूचे लोक इतिहासाला जिवंत करतात; आणि नुसते जिवंत करत नाहीत तर ते इतिहासाला आपल्या बाजूने उभे करतात असे प्रतिपादन फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी रविवारी सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल येथे केले. समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या समितीच्या वतीने येथील कळसुलकर हायस्कूल येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक पडेलकर होते तर सेक्युलर मूव्हमेंट महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मान. भरत शेळके हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी समता प्रेरणाभूमीचे अंकुश कदम, भावना कदम, सचिव मोहन जाधव,कवी विठ्ठल कदम, कांता जाधव, ममता जाधव,वासुदेव जाधव, पल्लवी जाधव, सेक्युलर मूव्हमेंटचे अजय देशमुख, सागर कांबळे, सर्जेराव कांबळे, रवीप्रकाश साबळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख मार्गदर्शक, विशेष अतिथी व मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी समता प्रेरणाभूमीच्या महिला कलावंतानी प्रेरणागीत सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. नंतर समितीच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात समता प्रेरणाभूमीच्या कार्याचे कौतुक करून समतेच्या लढाईत कार्यकर्ते बाबासाहेबांच्या सावंतवाडी भेटीचा आजच्या संदर्भात काय अन्वयार्थ लावतात आणि कोणती प्रेरणा घेतात यावर येथील चळवळीचे यशापयश अवलंबून आहे असे मत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, परिवर्तनवादी जेवढ्या चळवळी आहेत त्या अनित्यवादावर उभ्या आहेत. जगभर सुरू असलेल्या परिवर्तनवादी चळवळींचा पाया हा बुद्धाचा अनित्यवादच आहे, मग ते बुद्धाचं नाव घेवोत अथवा न घेवोत. जग हे ‘अनित्य’ आहे असं म्हणणं आणि जग हे ‘शून्य’ आहे असं म्हणणं यात फरक आहे. गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानातील आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे विभज्जवाद होय. वास्तविक गौतम बुद्धाचं समग्र तत्त्वज्ञान समजावून घेण्याची ती एक रीती आहे. आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये जे विश्लेषणवादी तत्त्वज्ञान आहे त्याचाच पूर्वसुरी म्हणजे विभज्जवाद होय. बाबासाहेबांनी जाती निर्मूलनाचा एक मार्ग म्हणून गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान, धम्म स्वीकारला. धम्म हा नैतिक आहे. माणसाला केंद्रबिंदू मानून माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असा आहे. धम्माचं एक वैशिष्ट्य आहे की, धम्म स्वीकारलेल्या माणसांमध्ये जात नेणीव आपोआप नष्ट होते किंवा नष्ट व्हायला पाहिजे अशी अपेक्षा असते. संपूर्ण दिवसभर दोन सत्रातील आपल्या मार्गदर्शन भाषणात आंबेडकरी चळवळीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये, आंबेडकरी चळवळीची कार्यपद्धती, चळवळीची परिभाषा, आंबेडकरी चळवळीचे इतर चळवळीहून वेगळेपण, आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त्यांची भूमिका, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे निकष, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता/ नेता यांचे परस्पर संबंध, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि विचार/ तत्त्वज्ञान, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि समाज /समस्या, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता आणि चळवळीतील विरोधक, आंबेडकरी चळवळ आणि आजची आव्हाने आधी महत्त्वपूर्ण विषयावर विस्तृत मांडणी केली. विशेष अतिथी मा. भरत शेळके यांनी आंबेडकरी चळवळीतील आंदोलने आणि आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे गोपीकृष्ण पवार, अंकुश कदम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सहभाग घेतला. उपस्थितीतांमध्ये शिवाजी राठये, गौतमी कांबळी, रश्मी पडेलकर, विनया कदम, मानसी कदम, गणपत जाधव, परशुराम जाधव, सुविधा सांगेलकर,वासंती तेंडोलकर,प्रियंका भापकर, रवींद्र भोसले, प्रवीण कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मोहन जाधव यांनी मानले.
जैविक प्रेरणेपेक्षा अधिक प्रभावी ठरते जातीची प्रेरणा ! : प्रा. गौतमीपुत्र कांबळे. ; सावंतवाडी येथे समता प्रेरणाभूमीच्या कार्यक्रमात मान्यवरांचे मार्गदर्शन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


