विवाहपूर्व समुपदेशन (Pre wedding Counselling ) :
अलिकडे Pre – Wedding फोटोग्राफी हा विवाह सोहळ्यातील किंवा विवाहपूर्व असा एक महत्त्वपूर्ण विधी झालेला आहे. तरुणाईमध्ये याची मोठी क्रेझ आहे. त्याच बरोबर लग्नात वारेमाप खर्च करण्याकडे अगदी सामान्य कुटुंबांचा देखील कल दिसून येतो.
अलिकडे आणखी एक गोष्ट वेगाने होताना दिसत आहे. ती म्हणजे लग्नानंतर अगदी कमी कालावधीमध्ये घटस्फोट किंवा काडीमोड . असे कां व्हावे ? वास्तविक अलिकडे वधू वरांची वये आता पूर्वी सारखी लहान राहिलेली नाहीत साधारणपणे २८-३० वय हेच आता बहुतेक शिक्षित वधूवरांचे लग्नाचे वय झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या विचारामध्ये पोरकटपणा असण्याचाही प्रश्न उरत नाही.
अगदी लग्न झाल्यानंतर १ -२ महिन्यातच नव्हे तर १-२ आठवड्यात वधू-वर विभक्त झाल्याचे मी स्वतः अनुभवले आहे. काही तर प्रेमविवाह होते . याचा अर्थ असा होतो की, विवाहानंतर आपल्याला नेमक्या कोणत्या भूमिका पार पाडायच्या आहेत याचे भान या मंडळीना येत नसावे . विवाह म्हणजे केवळ कामपूर्ति करण्याची समाजमान्य सोय नव्हे तर विवाहाने व्यक्तिला समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होत असते . परंतु त्याच बरोबर या दोघांनाही एकमेकांना समजून घ्यायचे आहेच याशिवाय दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या सोबतही त्यांची नाती जोडली जात असतात त्यादृष्टीनेही काही भूमिका पार पाडायच्या असतात . ही बाब ही मंडळी फारशी महत्त्वाची समजत नाहीत . आपल्या घरातील सासू , सासरे, नणंद , जाऊ तसेच मुलीकडील आईवडील मेहुणा किंवा मेहुणी यांच्या संदर्भात देखील आपली काही कर्तव्ये असतात ही गोष्ट तर या दोघांच्याही ध्यानी – मनी येत नसावी.

याशिवाय आपल्या जोडीदारा वर असणाऱ्या जबाबदाऱ्या , त्याच्या आवडी निवडी , एकमेकांच्या मित्रमैत्रिणी, एकमेकाच्या सहवासाच्या कल्पना, खाजगी पणाच्या कल्पना , एकमेकांना समजून घेण्यातील लवचिकता , या बाबत विवाह करताना दोघेही फारसे गंभीर असत नाहीत . बरेचदा तर असेही होते की, उशिरा होणाऱ्या लग्नामुळे उतावळेपणाने एकमेकांच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले जाते . पहिली एक दोन वर्षे प्रेमाचा महापूर ओसरला की, एकमेकांचे दुर्गुण टोचायला लागतात . बरे हे टोचणे सहन करण्याची सहनशक्तीही दोघांकडे नसते . अलिकडे मुलगी पहायला गेल्यावर मुलाला व मुलीला तुम्ही एकमेकाशी चर्चा करा अशी एक औपचारिक सोय करून दिली जाते . परंतु त्यात ते दोघे काय चर्चा करतात कोण जाणे .
पूर्वी मुला मुलींचे विवाह लवकर होत असत त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या म्हणून काही आवडी निवडी निश्चित झालेल्या नसत तशीच त्यांची स्वतःची मते, किंवा अलिकडच्या भाषेत स्वतःची स्पेस अशा गोष्टी नसत त्यामुळे दोघांच्या मिळूनच आवडी निवडी तयार होत . तसेच बऱ्याच ठिकाणी संयुक्त कुटुंब पद्धती असल्याने दोघांमध्ये विसंवाद झालाच तर मोठी माणसे समजूत घालत किंवा मोठ्या माणसांच्या आदरयुक्त धाकाने देखील हा विसंवाद टोक दार होत नसे .
आता , आपणास मागे जाता येत नाही. म्हणूनच मग विवाहेच्छू तरुण तरुणींना विवाहानंतरच्या जीवनासंबंधी मार्गदर्शन व समुपदेशन करणे आवश्यक ठरते . एका सामुदायिक विवाह समारंभात असे मार्गदर्शन केले जाते ते मी स्वतः ऐकलेले आहे. परंतु ते सार्वजनिक मार्गदर्शन मर्यादित स्वरूपातच उपयुक्त ठरते . कारण प्रत्येक जोडप्याचे प्रश्न वेगवेगळे असतात . म्हणून अशा विवाहेच्छू जोडप्यांना समुपदेशनाची गरज आहे.
आपण जो जोडीदार निवडतो आहे त्या ची आर्थिक स्थिती , त्याच्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या , एकमेकांच्या कुंटुबांची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात आणून देणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे देखील काही प्रश्न निर्माण होतात . तसेच आपल्या जोडीदाराच्या सवयी कोणत्या आहेत त्या सवयी आपल्याला कितपत सहन करता येतील यासंबंधी स्पष्टता लक्षात आणून देणे आवश्यक ठरते . जोडीदाराचा स्वभाव कसा आहे.छोट्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीच पुढे गंभीर रूप धारण करू शकतात व त्याचे पर्यवसान घटस्फोटा त होते. म्हणून वेळीच दक्षता म्हणून अशा विवाहेच्छूंनी समुपदेशन करून घ्यावे. त्यासाठी तशा संस्थाही निर्माण व्हाव्यात.
डॉ. ह. ना. जगताप
(माजी प्राचार्य)
ADVT –



