पुणे : तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुण माजी नगरसेविकेचा मुलगा आहे. याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याची आई माजी नगरसेविका असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021 मध्ये एका व्यायामशाळेत ओळख झाली होती. पीडित तरुणीचा व्यवसाय आहे. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले.
त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तो तिला भेटण्यासाठी घरी जायचा. तिने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. आरोपीचे अन्य तरुणींशी प्रेमसंबंध असल्याचा संशय तरुणीला होता. याबाबत तिने विचारणा केली असता त्याने तिला शिवीगाळ करून धमकावले. तिला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले, असे पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.


