आंबोली : अनेकदा सामान्य वाहन चालकांना नियम शिकवणारे परिवहन अधिकारी स्वतः मात्र आंबोली घाटात धोकादायक ठिकाणी आपली गाडी आडोशाला उभी करून वाहक तपासणी करत आहेत. या ठिकाणी वारंवार अशी तपासणी करत असून कुंभेश्वर नजीक उतारावर असणाऱ्या वळणावर एका हॉटेलच्या पार्किंग मध्ये आपली गाडी आडोशाला उभी करतात. घाट चढणाऱ्या वाहनधारकाच्या लक्षात ही गोष्ट येत नाही व चढाव व वळण असणाऱ्या ठिकाणी हे अधिकारी गाडी थांबवतात व त्यांची तपासणी करतात त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करीत आपले वाहन लगतच्या खाजगी हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभे करावे लागते. माल वाहतूक करणारे मोठे ट्रक घाट चढत असताना त्यांना चढावावर थांबवणे चुकीचे असताना देखील हे अधिकारी चालकांना नाहक त्रास देत असतात.
एरवी रस्ते सुरक्षा सप्ताह राबवून जनजागृती करणाऱ्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर कुठे थांबून तपासणी करावी?, हे जर कळत नसेल तर अशा अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार करणे गरजेचेआहे. सावंतवाडी आंबोली मार्गावर दानोली सातोळी तिठा येथे जिल्हा वाहतूक पोलिसांचे तपासणी नाके आहे तसेच आंबोली येथे पोलीस चौकी आहे. या दोन्ही ठिकाणी वाहने पार्किंग करण्यासाठी खूप मोठी जागा असताना देखील हे परिवहन विभागाचे अधिकारी घाटात धोकादायक ठिकाणी थांबण्याचे कारण काय? असा सवाल वाहनधारक करत आहेत. 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये तीन ठिकाणी वाहन तपासणी करून हे शासकीय अधिकारी वाहनधारकांना मुद्दामहून त्रास देत आहेत ज्या ठिकाणी पोलीस तपासणी नाके आहे त्याच ठिकाणी परिवहन विभागाद्वारे सुद्धा तपासणी करता येऊ शकते. यामध्ये वाहनधारकांचा सुद्धा वेळ वाचू शकतो. हे कोणीतरी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगणे गरजेचे आहे.


