नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्यानंतर भारतात एकच संताप व्यक्त केला जात होता. अशातच एक मोठी बातमी समोर आली असून पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव उघड झालं आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या गटाचे प्रमुख असलेला काश्मिरी शेख सज्जाद गुल (५०) हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली.
शेख सज्जाद गुल हा मुळचा काश्मिरी असून त्याला लष्कर-ए-तैयबाचं समर्थन आहे. एनआयएनं २०२२ मध्ये त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं. शेख सज्जाद गुल, ज्याला सज्जाद अहमद शेख म्हणूनही ओळखले जाते, तो लष्कर-ए-तैयबाच्या संरक्षणाखाली पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात लपून बसला आहे. तो २०२० ते २०२४ दरम्यान मध्य आणि दक्षिण काश्मीरमध्ये पूर्वतयारीने केलेला हल्ला, २०२३ मध्ये मध्य काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ले, अनंतनागमधील बिजबेहरा येथे जम्मू आणि काश्मीर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला, गगनगीर, गंदरबल येथील झेड-मोर बोगद्यावर हल्ला यासह अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आहे.


