नेल्लोर : पहलगाममधील झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अखेर भारताने बदला घेतला आहे. भारताने आधी अश्रूचा बदला पाण्याने घेतला. त्यानंतर थेट ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील अतिरेक्यांचे अड्डेच उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात असंख्य अतिरेकी मारले गेले आहेत. अतिरेक्यांचे नातेवाईकही मारले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तान हादरून गेला आहे. पाकिस्तानी नेते आणि जनताही बिथरली आहे. खासकरून पाकिस्तानी जनता पाक सरकारवर आगपाखड करताना दिसत आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करारा जवाब दिल्याने भारतामध्ये दिवाळी साजरी होत आहे. एवढेच नव्हे तर पहलगाम हल्ल्यात जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा या हल्ल्याचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
पहलगाम हल्ल्यात बंगळुरूचे टेक्निकल विशेषज्ञ एस. मधुसुदन राव यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या पत्नीने मीडियासमोर येऊन मोदींचे आभार मानले आहेत. माझ्या सिंदूरचा बदला सिंदूरने घेतला आहे. आता काही प्रमाणात पीडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला आहे. पहलगाम हल्ल्यात आपला नवरा गमावलेल्या महिलांच्यावतीने सरकारने ही कारवाई केली आहे. या ऑपरेशनला देण्यात आलेलं नावही सार्थक आहे, असं कामाक्षी प्रसन्ना यांनी सांगितलं. कामाक्षी या आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे राहतात. त्या मधुसुदन राव यांच्या पत्नी आहेत.
आमचं दु:ख दूर होणार नाही –
भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर कामाक्षी प्रसन्ना यांनी मीडियासमोर येऊन जाहीरपणे या हल्ल्याचं समर्थन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही कठोर कारवाई केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण कुटुंब कोसळलं होतं. कोणत्याही गोष्टीने आमचं दु:ख दूर होणार नाही. पण ऑपरेशन सिंदूरने आम्हाला थोडासा दिलासा मिळाला आहे, असं कामाक्षी म्हणाल्या. मधुसुदन राव हे आयबीएममध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होते. ते त्यांची पत्नी कामाक्षी आणि दोन मुलांसह जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते. त्यावेळी 22 एप्रिल रोजी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली.
आमचा सिंदूर पुसला त्यांना…
आपल्या सैन्याने हे मिशन पूर्ण केल्यानंतर एक दिवसाने आम्हाला याची माहिती मिळाली. कारण बातम्या पाहण्यासारखी आमच्या कुटुंबात परिस्थिती नाहीये. त्यामुळे काल दिवसभर आम्ही बातम्या पाहिल्या नाहीत. त्यामुळे या हल्ल्याची आम्हाला माहिती नव्हती. पण जशीही आम्हाला या ऑपरेशनची माहिती मिळाली, तेव्हा न्याय मिळाला ही आमची भावना झाली. ज्या लोकांनी आमचा सिंदूर पुसला, त्यांना सिंदूरनेच कायमचं संपवलं आहे, असं त्या म्हणाल्या.
नावातूनच आमचं दु:ख, वेदना…
पहलगाम हल्ल्यात अनेक महिलांनी आपले पती गमावले आहेत. पण आता न्याय झाला. या ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवलं. या नावातून आमचं दु:ख, वेदना व्यक्त होत आहे. मी मोदींचे मनापासून आभार मानते. आमच्यासोबत जे झालं, ते कुणाच्या बाबतीत होऊ नये हीच प्रार्थना आहे, असंही त्या म्हणाल्या.



 

