Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

चांगल्या सवयींसह भक्तिमार्गाची सवय जडायला हवी, जीवनाचा उद्धार होईल ! : प. पू. परमात्मराज महाराज.

कोल्हापूर : नामस्मरण करणे, पूजाअर्चा करणे, सद्ग्रंथांचे वाचन करणे आदी चांगल्या सवयींसह भक्तिमार्गाची सवय जडायला हवी. जीवनाचा उद्धार होईल, अशा चांगल्या सवयी असाव्यात. वाईट सवयींमुळे हानी होत असते. वाईट सवयी सोडून देणे, वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरीतील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरात दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता सर्वेज्य सांस्कृतिक भवनात नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलताना प. पू. परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, ‘‘वैशाख पौर्णिमा ही कूर्म जयंती, बुद्ध जयंती अशा अनेक अनुषंगाने विशेष महत्त्वाची आहे. ऋषी, मुनी, अवतार, सिद्ध, बुद्ध, तीर्थंकर, पैगम्बर इत्यादी नांवांनी ओळखल्या जाणाऱ्या सर्व विभूतींनी सद्वर्तनाचा बोध केला आहे. चांगल्या सवयी ठेवण्याविषयी सांगितले आहे. सर्व मानवजातीने विभूतींची शिकवण अंमलात आणली असती तर आतंकवाद निर्माण झाला नसता आणि इतरही विविधजातिधर्मपंथांमध्ये कलह निर्माण करणाऱ्या समस्या उत्पन्न झाल्या नसत्या. सवयींचे गुलाम असल्यामुळे काही वेळेला काही माणसांकडून चुकीचे वर्तन नकळत सुद्धा घडून जात असते.


एका व्यक्तीला दुसऱ्यांच्या शेतात चोरी करण्याची सवय होती. जे मिळेल ते तो चोरत असे. एके दिवशी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तो ‘चोरी करण्याची माझ्या हाताला सवय आहे’ असे म्हणू लागला. तेव्हा पोलिसांनी त्याला काठीने मार दिला. ‘काठीने मारण्याची माझ्या हातांनाही सवय आहे’, असे पोलीस त्याला म्हणाले. जसे कर्म, तसे फळ मिळत असते. दहशतवाद्यांना दहशत पसरविण्याची सवय आहे, भारताला त्यांच्या दहशती कारवाया मोडून काढण्यासाठी लढण्याची सवय आहे.
एक व्यसनी माणूस साधूकडे गेला आणि म्हणाला, ‘‘मला व्यसन जडले आहे, ते काही केल्या सुटत नाही.’’ तेव्हा साधूने एका झाडाला मिठी मारली व म्हणाला, ‘‘झाडाने मला धरून ठेवले आहे.’’ तेव्हा व्यसनी व्यक्ती म्हणाली, ‘‘तुम्हीच झाडाला धरून ठेवले आहे.’’ तेव्हा साधू म्हणाला, ‘‘तसेच तूही व्यसनाला धरून ठेवले आहेस, ते सोडणे आवश्यक आहे.’’
‘हार्पी’ नांवाची अतिमानव योनी असल्याचे युनानमध्ये मानले जाते. निरपराध लोकांना मारणाऱ्यांना, त्रास देणाऱ्यांना मृत्यूनंतर नरकात घेऊन जाण्याचे काम हे हार्पी करीत असतात, अशी युनानी लोकांची एक संकल्पना होती. विध्वसंक वातशक्तिरूप या हार्पींना तुम्ही विशिष्ट प्रकारचे यमदूत समजू शकता. त्यांना महिलेचे मुख आणि पक्ष्यासारखे बाकीचे शरीर असते. ते मृतात्म्यांना त्रास देत नरकात नेतात. माणसाने वाईट वागू नये म्हणून अशा प्रकारच्या संकल्पना जगभर आहेत. इस्रायलने बनविलेले ‘हार्पी आणि हारोप’ नांवाचे ड्रोनही अतिमानव हार्पीसारखेच काम करतात – आतंकवाद्यांचा नाश करतात, शोधून शोधून लक्ष्यभेद करतात. त्याप्रमाणे नियतीचे ड्रोन सुद्धा तुम्ही करीत असलेल्या पापाला लक्ष्य करून शिक्षा देत असतात. पापाचे अड्डे नियतीच्या ड्रोनद्वारे नष्ट होणारच, म्हणून माणसाने वाईट सवयी, वाईट कर्म सोडणे आवश्यक आहे.
काहींना केवळ चिंता करण्याची वाईट सवय असते. एखाद्याने काहीतरी बोलले, निंदात्मक बोलले, तर तेच दीर्घकाळ डोक्यात ठेवतात. त्यामुळे डोक्याला थकवा येतो. डिप्रेशनमध्ये जातात. जीर्णस्वरूपाच्या अवसादाला किंवा इतरही मानसिक आजारांना बळी पडतात. एखादी वस्तू हातात घेतल्यास सुरुवातीला ताण जाणवत नाही, पण तीच वस्तू जास्त वेळ हातात ठेवल्यास ताण जाणवतो. त्याप्रमाणे मनात नको ते त्रासदायक विचार दीर्घकाळ ठेवल्यास ताण निर्माण होतो. ज्या गोष्टीमुळे ताण निर्माण होईल, अशा गोष्टी मनात ठेवू नयेत. सद्ग्रंथांच्या वाचनाने, नामस्मरणाने ताण नाहिसा होतो.
सतत चिंता करण्याच्या वाईट सवयीमुळे कार्यकौशल्यावर आणि कार्यसामर्थ्यावर विपरीत परिणाम होतो. सर्वांना समस्या असतात, कामाचा व्याप असतो, पण त्याची चिंता करत बसू नये. जीवनामध्ये चढ-उतार येतच राहतात. अडचणीशी मुकाबला करावा.


कोट्यधीश अभिनेता एका जाहिरातीत ‘चोवीस रुपयांच्या टूथपेस्टवर चार रुपये सूट’ असे म्हणत अतिशय अतिशय आनंद व्यक्त करतो. प्रत्यक्षात त्याला चार रुपयांची सूट मिळाल्याचा आनंद नसतो, तो केवळ अभिनय असतो. अध्यात्मात मात्र अभिनय चालत नाही. आध्यात्मिक जीवन हे वास्तव जीवन असते. यामध्ये अभिनयाची सवय नसावी. अध्यात्माच्या क्षेत्रात मनाची खरी भूमिका असावी, याची जाणीव ठेवावी.
अगदी लहान झाड उपटून टाकण्याचे काम छोटा मुलगा करू शकतो; मात्र तोच मुलगा मोठे झाड उपटू शकत नाही. त्याप्रमाणे वाईट सवयी बालरूपात असतानाच संपवणे आवश्यक आहे. बीडी-सिगारेट पिणारे काही व्यसनी लोक कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मरण पावले. अशा सवयी वेळेत सोडणे आवश्यक आहे, अन्यथा फुफ्फुसांचे आजार होतात. आयुष्याचा अमूल्य काळ आळशीपणात वाया घालवू नये. चांगल्या सवयी लावून घेऊन आयुष्याचा सदुपयोग करावा. चिरनिद्रेला जाण्याआधी जागृत होणे गरजेचे आहे. मंत्रजप, वाचन करत आध्यात्मिक वाटचाल करावी. वाईट सवय लागली असेल, तर ती दूर करणे आवश्यक आहे. सामान्यतः नखे तोंडाने कुरतडून खाण्याची अनेकांना वाईट सवय असते. पूर्ण जगाचा विचार करता बत्तीस प्रकारचे बॅक्टेरिया, अठ्ठावीस प्रकारचे फंगस नखांशी संबंधित जागेत आढळून आले आहेत. ज्याच्या नखात जे अनिष्ट बॅक्टेरिया किंवा फंगस असतील ते नख खाण्याच्या वाईट सवयीमुळे पोटात जाऊन अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकत असतात. कोरोना महामारीमुळे अनेकांना हात धुण्याची चांगली सवय लागली आहे. काहींना अंथरुणावर बसून जेवण्याची वाईट सवय असते. ही सवय वास्तुशास्त्र व आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनेही अयोग्य आहे. आश्रायणि महर्षींनी सांगितले आहे की, जीवनात कितीही संकटे आली तरी साधना ढळू द्यायची नाही. भक्तिमार्गावरून ढळू नये, असा उपदेश त्यांनी केला.
या प्रवचनावेळी विनायक सुधाकर आंबले (निपाणी) यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. आप्पासो नरसगोंडा पाटील (हंचिनाळ) यांनी पंचवीस लाखांहून अधिक वेळा “जय परेश सर्वायण” हा वैश्विक मंत्र लिहून साधना केल्याबद्दल, सुखदेव साळुंखे यांनी ॲम्ब्युलन्स देणगीस्वरूपात देण्याचे जाहीर केले त्याबद्दल, तेजस्विनी संजय हंचिनाळे (कोल्हापूर), रामचंद्र लाटकर (सिंधुदुर्ग), शकुंतला नाधवडे (आडी), कृष्णात पाटील (कोगनोळी), शोभा शिवदास (कोगनोळी), राजनंदा राजू नाईक (कुन्नूर) आदी मान्यवर, देणगीदार भाविकांचा प. पू. परमात्मराज महाराज आणि देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आडी परिसरासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा इ. राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles