सावंतवाडी : जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये वह्या व इतर शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसाय केला जात असल्यामुळे शैक्षणिक साहित्य विक्री करणारे व्यापारी अडचणीत आले असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसायिक संघटनेने निवेदनाद्वारे केला आहे. तसे लेखी निवेदन संघटनेने राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांसह माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांना सादर केले आहे.
आपल्या निवेदनात संघटना पुढे म्हणतात, सिधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याचशा नामांकीत अनुदानित शाळांमधून राजरोसपणे वह्या, गाईड्स व व्यवसायमाला यांची विक्री होते. शासनाच्या आदेशाप्रमाणे तसेच २८ एप्रिल २०२५ रोजी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या आदेशान्वये कुठच्याही शाळेतून अशी विक्री करता येत नाही. अशा विक्री करणाऱ्या काही शाळांची नावे आम्ही आपणास सादर करीत असून सदर शाळांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी निवेदनद्वारा विनंती सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक साहित्य विक्री व्यावसाईक संघटनेचे अध्यक्ष साईश कुमार केसरकर यांनी केली आहे.


