Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार.! : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ; इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण!

मुंबई : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटरवर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटनस्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना –

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदूषणास आळा बसणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या महामार्गावर वाहन चालकांनी वेग मर्यादेचे व वाहतूक निमयांचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

*अन्य प्रकल्पांनाही गती*

जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles