सावंतवाडी : शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये आज शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे उपस्थित होते. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, केंद्र प्रमुख कमलाकर ठाकूर, डाएटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. सुरेश माने, सेवानिवृत्त प्रा. गिरीधर परांजपे, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, समृद्धी विर्नोडकर, दिपाली सावंत, शाळा शिक्षण समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर, ललिता सिंग, किरण नाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वी ज्युनिअर आणि सिनियर केजी नव्हते, तेव्हा थेट अक्षर ओळख करून दिली जात होती. आता नवीन शैक्षणिक धोरणात तीन स्तरांवर शिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक असे पाच वर्ग असणार आहेत. हे शिक्षण अधिक व्यापक असून ते मातृभाषेतून दिले जाणार आहे. श्री. केसरकर यांनी सांगितले की, आता इंजिनीअरिंगचे शिक्षण मराठीतून दिले जात आहे आणि लवकरच वैद्यकीय शिक्षणसुद्धा मातृभाषेतून देण्याची मागणी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली जाईल. तसेच, पुस्तकांचा बोजा कमी करण्याबाबत शिक्षण मंत्री दादा भुसे आणि मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी शिक्षकांच्या योगदानाला महत्त्व दिले आणि शाळेला शेडसाठी १५ लाख रुपये व शालेय पोषण आहारासाठी पाच लाख रुपये असे एकूण 20 लाखांची मदत देण्याची घोषणा केली. महायुतीनेच मिड डे मील दर्जेदार मिळावा आणि स्मार्ट टीव्ही योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे आणि शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम येण्याची परंपरा कायम ठेवावी, असेही आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाएटचे डॉ. माने यांनी प्रस्तावना केली. ते म्हणाले की, शाळेने गुणवत्तेत चांगली भर घातली आहे आणि शाळेची पटसंख्या पुन्हा वाढून २०० वर गेली आहे, ही अभिमानास्पद बाब आहे.
यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमधून उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण मिळते. त्यांनी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतल्याचे सांगितले. भावी पिढीला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांचे त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी योग्य आकार घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
संजू परब यांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला की, मुलांना पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी आमदार दीपक केसरकर स्वतः आले. ते म्हणाले की, याच शाळेत शिकलेला विद्यार्थी नगराध्यक्ष आणि इंजिनिअर होऊ शकतो. येथील शिक्षक दर्जेदार शिक्षण देतात, त्यामुळेच शाळेची पटसंख्या वाढत आहे. केसरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या नाविन्यपूर्ण निर्णयांचा महाराष्ट्राला आणि शाळेला फायदा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान यावेळी आमदार दीपक केसरकर व संजू परब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश व पुस्तकांचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक महेश पालव यांनी केले. त्यांनी सांगितले की, शाळेतील ३ विद्यार्थी नुकतेच विमानप्रवासाने इस्त्रोला भेट देऊन आले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. शेवटी, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


